कर्जाचे ७८ कोटी थकवले, तासगावकर शिक्षण संस्थेवर आयकर धाडीनंतर बँकेची ताबा नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली कर्जतची तासगावकर शिक्षण संस्था सध्या चांगलीच अडचणीत सापडली आहे. संस्थेच्या विविध मालमत्तांवर आज आयकर विभागाने धाडी टाकल्यानंतर लगेच बँक ऑफ इंडियाने चांदई येथील तासगावकर कॉलेज तसेच भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजवर ताबा नोटीस बजावली आहे. सारफेसी कायद्यांतर्गत ही नोटीस लावली आहे. शिक्षण संस्थेने कर्जाचे ७८ कोटी २१ लाख रुपये थकवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. एकाच दिवशी आयकर विभाग व बँकेने बडगा उगारल्याने रायगड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कर्जत तालुक्यात तासगावकर शिक्षण संस्थेचा मोठा बोलबाला असून इंजिनीयरिंग, मेडिकल यासंह अनेक शाखा आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या संस्थेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आज सकाळी आयकर विभागाने डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या समूहाशी संबंधित इंजिनीयरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, रायगड हॉस्पिटल तसेच इतर कार्यालयांवर धडक छापेमारी केली. त्यानंतर सायंकाळी बँक ऑफ इंडियाने चांदई येथील तासगावकर कॉलेज व भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या मालमत्तेवर प्रतीकात्मक ताबा घेतल्याची नोटीस लावली.

 

नोटीसमध्ये नंदकुमार तासगावकर, डॉ. शशिकांत गंगावणे, यादवराव कांबळे, राजेश तासगावकर, वंदना तासगावकर, सरस्वती कांबळे, चंद्रशेखर सुळगावकर तसेच संबंधित शिक्षण संस्थेचा उल्लेख करण्यात आला आहे.

 

यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी मागणी नोटीस बजावण्यात आली होती, तर २५ फेब्रुवारी २०२६ रोजी वृत्तपत्रांतही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. तरीही थकबाकीची परतफेड न झाल्याने बँक ऑफ इंडियाने अखेर थेट ताबा नोटीस बजावली.
मुंबईहून आलेल्या आयकर विभागाच्या टिमने कर्जतमधील शैक्षणिक संस्था, रुग्णालय, कार्यालये, व्यावसायिक फर्म तसेच मुंबईतील काही माल मत्तांचीही तपासणी करण्यात आल्याचे समजते.

 

कुणीही व्यवहार करू नका
सायंकाळी बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलाइज्ड अॅसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखेकडून चांदई येथील तासगावकर शिक्षण संस्थेच्या मालमत्तेसह भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजशी संबंधित मालमत्तेवर ताबा नोटीस लावण्यात आली. नोटीसनुसार ७८ कोटी २१ लाख २ हजार ५०४ रुपयांच्या थकबाकीची परतफेड न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये, अन्यथा तो बँकेच्या हक्कांच्या अधीन राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.