
पेणमध्ये गेल्या आठवडाभरापासून दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या. मात्र यात कोणतीही सुधारणा झाली नसून तहान भागवण्यासाठी पेणकरांना टँकर आणि बिसलेरीचा आधार घ्यावा लागत आहे. शुद्ध पाणी द्या, नाही तर पाणीपट्टी माफ करा, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनीयर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते जीवन पाटील यांनी नगर परिषदेकडे केली आहे.
पेण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी भोगावती नदीच्या पिंपळडोहातून पाइपलाइन टाकण्यात आली आहे. पेण शहराला लोकसंख्येनुसार दररोज १८ एमएलडी पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र पेण नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण संचाची पाणी शुद्ध करण्याची रोजची पात्रता फक्त ५ एमएलडी एवढीच आहे. त्यामुळे शुद्ध पाणी कधी मिळणार, असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे. पुराच्या संकटातून सावरत नाही तोच पेणवासीयांच्या समोर नवे संकट उभे राहिले आहे. पेण शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. हे पाणी प्यायल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तरीही प्रशासनाला जाग नाही
दरवर्षी पावसाळ्यात गढूळ, अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा करण्यात येतो. या गंभीर समस्येबाबत अनेक आंदोलने, निवेदने देण्यात आली. मात्र तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. नागरिकांकडून नियमितपणे पाणीपट्टी आकारूनदेखील त्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे एका वर्षाची पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनीयर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष जीवन पाटील यांनी केली आहे.
नळातून येणारे पाणी पिण्यासाठी तर दूरच राहिले. हे पाणी वापरण्यासाठीही योग्य नाही. दूषित पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांमध्ये पोटाचे विकार, अतिसार, टायफॉईड, खाज येणे यांसारखे आजार बळावले आहेत.
नागरिकांनी याबाबत अनेकदा आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या. तरी प्रशासनाने आतापर्यंत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, असा अरोप ग्रामस्थांनी केला आहे.






























































