पुणे पालिकेचे गोल गोल पाणी; शहरात आता 22 जुलैपर्यंत पाणीकपात स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणीकपातीच्या निर्णयावरून पुणे महापालिकेत प्रशासन आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमधील विसंवादाचा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी १५ जुलैपासून शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतर अवघ्या २४ तासांत महापौर मंजूषा नागपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन २२ जुलैपर्यंत पाणीकपात स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यातील समन्वयाअभावी पुणेकर मात्र संभ्रमात पडले आहेत.

धरणसाखळीत केवळ ५.८७टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने यंदा १५ जूनपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. दरम्यान, आषाढी पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी पुण्यात दाखल होणार असल्याने ७ ते १२ जुलैदरम्यान पाणीकपात स्थगित करण्यात आली होती. पालखी सोहळा संपताच आयुक्तांनी पुन्हा १५ जुलैपासून पाणीकपात लागू करण्याची घोषणा केली. मात्र, महापौरांनी पत्रकार परिषद घेऊन वेगळी भूमिका घेत २२ जुलैपर्यंत निर्णय पुढे ढकलला आहे. या पत्रकार परिषदेला स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर उपस्थित होते.

महापौर नागपुरे म्हणाल्या, ‘खडकवासला धरणसाखळीत सध्या सुमारे ५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हवामान विभागाने १९ जुलैनंतर पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, त्यानुसार धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाल्यास पाणीकपातीची गरज भासणार नाही. त्यामुळे २२ जुलै रोजी हवामान विभाग, जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल,’ असे स्पष्ट केले. मात्र, यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर २२ जुलैपर्यंत परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक होते, तर आयुक्तांनी १५ जुलैपासून पाणीकपातीची घोषणा इतक्या घाईने का केली? आणि जर तो निर्णय चुकीचा होता, तर महापौर आणि सत्ताधारी पदाधिकारी त्यावेळी गप्प का होते? आयुक्तांची घोषणा झाल्यानंतरच हस्तक्षेप करण्याची वेळ का आली? अशा प्रश्नांची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

  • प्रशासन-सत्ताधाऱ्यांतील विसंवाद चव्हाट्यावर
  • आयुक्तांची घोषणा २४ तासांत बदलली
  • पुणेकरांच्या नियोजनाचा बोजवारा
  • आधीच कमी दाबाने पाणी, त्यात बदलत्या निर्णयांमुळे पुणेकरांचे नियोजन कोलमडले

नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

आधीच शहरातील अनेक भागांत कमी दाबाने पाणी येत आहे. काही भागांत नियमित वेळापत्रक असूनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत एक दिवस पाणीकपातीची घोषणा आणि दुसऱ्याच दिवशी ती स्थगित करण्याची घोषणा झाल्याने पुणेकरांच्या दैनंदिन नियोजनाचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, महापालिकेच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

घाईघाईचे निर्णय टँकर लॉबीच्या फायद्याचे – विवेक वेलणकर

‘आज खडकवासला धरणसाखळीत जवळपास १७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. महापालिका दरमहा सुमारे दीड टीएमसी पाणी वापरते. अजून पावसाळ्याचे अडीच महिने बाकी असताना दिवसाआड पाणीपुरवठ्याची घाई करण्याचे कारण समजत नाही. काही दिवसांपूर्वी धरण भरल्याने अतिरिक्त पाणी नदीत सोडावे लागले आणि आता नागरिकांवर पाणीकपात लादली जाते, हा विरोधाभास आहे. अशा निर्णयांचा सर्वाधिक फायदा टँकर व्यवसायालाच होतो. २४ तास पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नागरिकांच्या करातून सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च झाले, तरी भरपावसाळ्यातही नियमित पाणीपुरवठा करता येत नसेल, तर त्या योजनेचे अपयश स्वीकारण्याची वेळ आली आहे. किमान १५ ऑगस्टपर्यंत पाणीकपात रद्द करून त्यानंतर परिस्थितीचा आढावा घ्यावा,’ अशी मागणी ‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

पाणीकपातीचा घटनाक्रम

१५ जून – धरणसाखळीत केवळ ५.८७ टीएमसी साठा; शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू.
७ ते १२ जुलै – आषाढी पालखी सोहळ्यामुळे पाणीकपात स्थगित.
१३ जुलै – आयुक्त नवलकिशोर राम यांची घोषणा, १५ जुलैपासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा !
१४ जुलै – महापौर मंजूषा नागपुरे यांचा ‘यू टर्न’, २२ जुलैपर्यंत पाणीकपात नाही !
१९ जुलै – हवामान विभागाचा पावसाचा अंदाज.
२२ जुलै – आढावा बैठक, त्यानंतर अंतिम निर्णय.