शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान योजना-२०१९च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवर आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे १३ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. याशिवाय २०२६-२७मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी २०१९च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ५० हजार ऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निकष सुधारणेमुळे २०१९च्या कर्जमाफी योजनेतील १३ लाख शेतकऱ्यांसाठीची ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून त्यांना नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर २०२६-२७मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ही योजना सरकारने यापूर्वीच जाहीर केली आहे.