पश्चिम आशियातील संघर्षात १३ हिंदुस्थानींचा मृत्यू; होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांवरील हल्ल्यांबाबत हिंदुस्थानचा इराणकडे तीव्र निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम आशियात यंदाच्या फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत १३ हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू झाला असून आणखी तीन हिंदुस्थानी बेपत्ता आहेत. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे या भागातील सागरी वाहतूक आणि ऊर्जा पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. NDTV ने याबाबत वृत्त दिले आहे.

अलीकडे इराण आणि अमेरिकेकडून झालेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील अंतरिम शांतता करारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा संघर्ष २८ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून एका बाजूला इराण तर दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इस्रायल अशी परिस्थिती आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पश्चिम आशियातील घडामोडींवर हिंदुस्थान बारकाईने लक्ष ठेवून आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्याविना सागरी वाहतूक तसेच व्यापारी हालचाली सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. जागतिक आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

होर्मुझ सामुद्रधुनीतून जात असताना एमटी अल बहियाह आणि एमटी मोम्बासा या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने इराणच्या दूतावासातील उपप्रमुखांना पाचारण करून तीव्र निषेध नोंदवला आहे. या दोन्ही जहाजांवर एकूण ४६ कर्मचारी होते, त्यापैकी ३० हिंदुस्थानी होते.

एमटी अल बहियाहवर १२ भारतीय कर्मचारी होते. त्यापैकी एका हिंदुस्थानींचा मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे. एमटी मोम्बासावर १८ हिंदुस्थानी कर्मचारी होते. त्यापैकी नऊ जण जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

जयस्वाल म्हणाले की, एका हिंदुस्थानीचा मृत्यू आणि अनेक हिंदुस्थानी जखमी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्यांबाबत इराणकडे हिंदुस्थानने तीव्र निषेध नोंदवला असून अशा घटना तातडीने थांबल्या पाहिजेत, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

हिंदुस्थानने पश्चिम आशियातील तणाव तातडीने कमी करण्याचे आवाहन केले आहे. इराण आणि अमेरिकेने चर्चेच्या माध्यमातून मतभेद सोडवून संवाद आणि राजनैतिक मार्ग स्वीकारावा, जेणेकरून या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता प्रस्थापित होईल, असे जयस्वाल यांनी सांगितले.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मृत भारतीय नागरिकाच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमी भारतीय नागरिकांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातीतील हिंदुस्थानचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून प्रभावित भारतीय खलाशांना आवश्यक ती सर्व मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.