
मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. तेजश्रीने नुकतीच मर्सिडीजची नवी कोरी आलिशान कार खरेदी केली असून तिच्या सोशल मीडिया पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांप्रमाणेच आता तेजश्रीच्याही ताफ्यात मर्सिडीजचा समावेश झाला आहे.
तेजश्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नव्या कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात ती ड्रायव्हिंग सीटवर बसलेली दिसत असून तिच्या चेहऱ्यावर नव्या गाडीचा आनंद स्पष्टपणे झळकत आहे. विशेष म्हणजे, ही कार तिने गेल्या महिन्यातच खरेदी केली होती. फोटोसोबत तिने, “आणि एक महिना झाला… आता प्रवास आणखी सुखकर वाटतो,” असे कॅप्शन लिहिले आहे.

तेजश्रीच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेते प्रशांत दामले, सुबोध भावे, रुपाली भोसले, प्रसाद जवादे आणि रेश्मा शिंदे यांनी कमेंट करत तिचे अभिनंदन केले आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे तेजश्री प्रधान घराघरांत पोहोचली होती.




























































