
अहमदाबाद येथे जून २०२५ मध्ये झालेल्या एअर इंडिया AI-171 विमान दुर्घटनेला जवळपास वर्ष पूर्ण होत असताना, या दुर्घटनेच्या तपासाचा अंतिम मसुदा अहवाल यंदाच्या ऑक्टोबरमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. विमान अपघात तपास ब्युरो (Aircraft Accident Investigation Bureau – AAIB) ने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. तसेच, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग (CVR) आणि विमानातील कॅमेऱ्यांचे ध्वनी व चित्रफीत कोणत्याही बाह्य समितीला किंवा सर्वसामान्यांना देण्यास कायद्याने स्पष्ट मनाई असल्याचेही एएआयबीने न्यायालयाला सांगितले.
दिवंगत वैमानिक कमांडर सुमीत सभरवाल यांचे वडील पुष्कराज सभरवाल यांनी या दुर्घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर उत्तर देताना एएआयबीचे महासंचालक यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.
प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार एअरक्राफ्ट (इन्व्हेस्टिगेशन ऑफ अॅक्सिडेंट्स अँड इन्सिडेंट्स) नियम, २०२५ मधील नियम १७(१), नियम १७(५) आणि अनुसूची ‘सी’नुसार कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग, तसेच विमानातील कॅमेऱ्यांचे ध्वनी आणि चित्रफीत सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे ही माहिती बाह्य समितीला देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी कायद्याच्या विरोधात असल्याचे एएआयबीने स्पष्ट केले.
एएआयबीने न्यायालयाला सांगितले की, आंतरराष्ट्रीय उड्डाणाशी संबंधित गंभीर विमान दुर्घटनेचा तपास हा केवळ देशांतर्गत विषय नसून तो शिकागो करार आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO) च्या अॅनेक्स-१३ अंतर्गत केला जातो. या नियमांनुसार ज्या देशात दुर्घटना घडते त्या देशाने तपास सुरू करणे बंधनकारक असते. तसेच विमानाची नोंदणी असलेला देश, विमान चालवणाऱ्या कंपनीचा देश, विमानाची रचना आणि उत्पादन करणाऱ्या देशांनाही तपासात सहभागी होण्याचा अधिकार असतो. त्यामुळे हा तपास आंतरराष्ट्रीय नियमांनुसार समन्वयाने केला जात असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
तपासादरम्यान संबंधित व्यक्तींचे जबाब, विमान संचालनाशी संबंधित अधिकाऱ्यांमधील संवाद, कॉकपिटमधील संभाषण, विमानातील कॅमेऱ्यांचे ध्वनी व चित्रफीत तसेच अपघातातील व्यक्तींची वैद्यकीय आणि वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. या सर्व माहितीच्या गोपनीयतेसाठी नियम २०२५ मध्ये स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत.
जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया AI-171 विमान दुर्घटनेत एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये २२९ प्रवासी, १२ कर्मचारी आणि जमिनीवरील १९ नागरिकांचा समावेश होता.



























































