
शिवसेना सोडून गेलेल्या गद्दार खासदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचे गाठोडे घेऊन दिल्लीला उतरले आणि देशाच्या गृहमंत्र्यांकडे गेले. हा माझा चोरीचा माल याला सोन्याचा मुलामा द्या आणि याला गृहमंत्री मान्यता देत असतील तर मला देशाच्या कायद्याविषयी चिंता वाटते, असे संजय राऊत नागपूर येथे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, या देशात कायदा आहे की नाही माहिती नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही. गृहमंत्र्यांकडे चोरीचा माल घेऊन जातात ही गंभीर गोष्ट आहे. एखादा साधा चोर जर चोरीचा माल घेऊन जात असेल तर पोलीस त्याला हटकतात.
एकनाथ शिंदे मुंबईतून चोरीचं गाठोडं घेऊन दिल्लीला उतरले आणि ते चोरीचे गाठोडे घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले. माझा चोरीचा माल आहे आणि आता याला सोन्याचा मुलामा द्या, असे म्हणाले. गृहमंत्री त्याला मान्यता देत असेल तर मला देशाच्या कायद्याविषयी चिंता वाटते. ज्यांच्या डीएनएमध्ये चोरी हाच एक महत्त्वाचा विषय आहे त्यांच्याविषयी काय बोलायचे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
सोनम वांगचुक यांची प्रकृती ढासळतेय, हा चिंतेचा विषय
आज खरे म्हणजे देशापुढील सगळ्यात गंभीर प्रश्न नीट परीक्षेच्या पेपरफुटीविरुद्ध गेल्या 17 दिवसांपासून जंतरमंतरवर उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांचा आहे. त्यांची प्रकृती कमालीची ढासळलेली आहे. हा आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत चिंतेचा विषय असला पाहिजे, असे राऊत म्हणाले.
डिलिमिटेशन विधेयकाबाबत काय म्हणाले?
डिलिमिटेशन विधेयकाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आम्ही डिलिमिटेशन विधेयकाला पाठींबा देणार हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे विधेयक या अधिवेशनात येणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. जेव्हा येईल तेव्हा आम्ही सगळे बसून निर्णय घेऊन. हे विधेयक कशा प्रकारे असायला हवे या संदर्भात मागच्या अधिवेशनात सरकारशी चर्चा झाली होती. या चर्चेत शिवसेनेतर्फे अरविंद सावंत, राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे आणि समाजवादी पार्टीचेही नेते उपस्थित होते. आताही आम्ही एकत्र बसून या विधेयकावर चर्चा करू. चर्चेची जागा दिल्ली आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच या संदर्भात सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेणार आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.































































