
केज-तालुक्यातील जवळबन येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक जणांचा मृत्यू यापूर्वी झालेला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ग्रामीण भागामध्ये गाव तिथं ठेले, हातभट्ट्या सर्रास सुरू आहेत. दारू सहज उपलब्ध होत असल्यामुळे व्यसनाधिनता वाढत आहे. कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. आज (15 जुलै 2026) नारी शक्तीची ताकद जवळबन गावाने अनुभवली. संपूर्ण महिला आज एकत्र आल्या आणि अवैध दारू विक्रीविरोधात हल्लाबोल केला.
केज तालुक्यातील जवळबन येथे दारूच्या आणि सततच्या पुरूषांच्या व्यसनाधीनतेला वैतागून गावातील संपूर्ण महिलांनी एकत्र येऊन बुधवार रोजी सकाळी आठ वाजता आक्रोश रॅली गावात काढली. महिलांच्या पुढाकारानंतर पुरुष मंडळी यामध्ये सहभागी झाले. गावात दारू विक्री करणार्यांच्या घरावर थेट मोर्चा धडकला. महिलांचा रूद्रावतार पोलिसांनीही अनुभवला. यावेळी व्यसनाधीन झालेल्या कुटुंबातील महिलांनी अक्षरशः हंबरडा फोडून व्यथा मांडल्या. यावेळी अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते. सर्व संतप्त झालेल्या महिलांनी यापुढे अवैध दारू विक्री गावात आढळून आल्यास थेट हल्लाबोल करण्याचा इशारा दिला आहे. गावात दारू विक्री होऊ नये यामुळे आमचे वडील दारू पिऊन आम्हाला मारहाण करतात घरातील सगळ्या वस्तू विकतात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो, अशा वेदना लहान मुलींनी व्यक्त केल्या































































