Mumbai News – घरगुती भांडणातून भररस्त्यात पत्नीला चाकूने भोसकले, पतीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती भांडणातून भररस्त्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकल्याची घटना ओशिवरा परिसरात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. झुमरी धिरज पवार असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेतील आदर्श नगर येथे एक महिला जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. ओशिवरा बीट मार्शल 4 वर कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई आकाश बागल यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता एक महिला जखमी अवस्थेत आढळून आली. महिलेच्या गळ्यावर जखम होऊन रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले.

आकाश बागल यांनी सदर जखमी महिलेला निर्भया वाहनातून ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस तपासात घरगुती भांडणातून महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीचा शोध घेत त्याला बेहरामबाग येथून ताब्यात घेत अटक केली. पुढील तपास ओशिवरा पोलीस करत आहेत.