
इस्रायलने मध्य गाझामधील ‘दीर अल बलाह’ या निवासी भागातील एका इमारतीवर मोठा हल्ला केला आहे. इस्रायली हल्ल्यात 3 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
गाझामधील वैद्यकीय सूत्रांनुसार, या हल्ल्यात ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून आजूबाजूच्या परिसराचेही मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांना लक्ष्य करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठीच इस्रायलने हा हल्ला केल्याचा आरोप रुग्णालयातील सूत्रांनी केला आहे. दुसरीकडे, मंगळवारी झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये 10 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. ऑक्टोबरमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम लागू झाल्यापासून आतापर्यंत 1 हजार 100 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हा ताजा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा हमासचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘गाझा शांतता योजनेच्या’ दुसऱ्या टप्प्यावर चर्चा करण्यासाठी कैरो येथे गेले आहेत. या चर्चेत हमासचे निःशस्त्रीकरण आणि इस्रायली सैन्याची माघार या मुद्द्यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांत शांतता कराराच्या दिशेने फारशी प्रगती झालेली नाही. इस्रायलकडून वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन हाच ट्रम्प यांच्या योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वात मोठा अडथळा असल्याचे हमासचे म्हणणे आहे. गाझामधील परिस्थिती पाहता अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांच्या एका गटाने इस्रायलला दिली जाणारी लष्करी मदत थांबवण्याची मागणी केली आहे. प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅट्सचे नेते ग्रेग कॅसर यांनी गाझा आणि लेबनॉनमधील लष्करी कारवायांसाठी वापरली जाणारी अमेरिकन मदत त्वरित बंद करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी इस्रायली सैन्याला दिली जाणारी 3.3 अब्ज डॉलर्सची प्रस्तावित मदत थांबवण्याच्या दुरुस्तीला पाठिंबा दिला आहे. तसेच, खासदार रो खन्ना यांनीही गाझामधील नरसंहाराचा आरोप असलेल्या देशाला लष्करी मदत देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.




























































