
थार रिव्हर्स घेताना पार्किंग लॉटमध्ये झोपलेल्या मोलकरणीला चिरडल्याची धक्कादायक घटना हरियाणात घडली. या अपघातात मोलकरणीचा जागीच मृत्यू झाला. गुरुग्राममधील सेक्टर 67 मधील अंसल अरसालिया सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये ही घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गाडी चालवणाऱ्या महिलेने निष्काळजीपणे गाडी रिव्हर्स घेतल्याने हा अपघात झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, गुड्डी असे मयत महिलेचे नाव असून, ती मूळची उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील रहिवासी होती. ती गुरुग्राममध्ये मोलकरीण म्हणून काम करत होती. ही घटना घडली तेव्हा ती सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये आराम करत होती. यादरम्यान लाल रंगाची थार चालवणाऱ्या महिलेला गाडी रिव्हर्स घेताना ती दिसली नाही आणि तिने तिला चिरडले. गंभीर दुखापतींमुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर महिला चालकाने जखमी गुड्डीला तिच्या दुसऱ्या गाडीतून एका खाजगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयातून परतल्यानंतर त्या महिलेने मृतदेह सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोडून दिला, असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. तपासात निष्काळजीपणा निष्पन्न झाल्यास संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल.



























































