पंढरपूर कॉरिडॉर बाधित आक्रमक, मुख्यमंत्र्यांना दाखवणार काळे झेंडे; दुकानं बंद ठेवून करणार निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर कॉरिडॉर करताना बाधितांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉर करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र बाधितांना विश्वासात न घेताच कॉरिडॉर करण्याचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आमचा विश्वासघात केल्याची भावना बाधित कुटुंबामध्ये निर्माण झाली असून 24 आणि 25 जुलै रोजी आपली दुकाने बंद ठेवून निषेध करण्याचा निर्धार करताना शासकीय महापूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून स्वागत करणार असल्याचे बाधितांचे नेते बाबाराव महाजन बडवे यांनी जाहीर केले.

श्री विठ्ठल मंदिराजवळ बाधित कुटुंबाची आज बैठक पार पडली. या बैठकीला बाधित व्यापारी व बाधित कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉरिडॉर आराखडा करताना विश्वासात घेण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही अशी नाराजी व्यक्त केली.

कॉरिडॉर मध्ये सहाशेहून अधिक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागणार आहे. घरे आणि व्यापारी दुकाने बाधित होणार असल्याने अनेकांनी संतापाची भावना व्यक्त केली. येत्या 25 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे. सुमारे तीस लाख वारकरी भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.

एकादशीच्या पूर्व संध्येला म्हणजे 24 जुलै रोजी सकाळी 8 ते 25 जुलैच्या सकाळी 8 वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय बाधित व्यापाऱ्यांनी घेतला आहे. 24 तास प्रासादिक व अन्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेत असताना, आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी श्री विठ्ठल मंदिरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करणार असल्याचे बाबाराव महाजन बडवे यांनी स्पष्ट केले.