
पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याविरोधात जनतेत रोष वाढत आहे. आता त्यांना बुलचिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधून खुले आव्हान देण्यात आले आहे. जमियत उलेमा-ए-इस्लाम फजल (JUI-F) चे प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी मुनीर यांनी थेट आव्हान दिले आहे. लष्कराला राजकारणात यायचे असेल, तर त्यांनी आपला गणवेश उतरवून स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि निवडणुका लढवाव्यात, असे आव्हान देत त्यांनी बलुचिस्तान आणि पश्तून भागातील परिस्थितीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
एका जाहीर सभेत बोलताना फजलुर रहमान म्हणाले की, देशाचे संरक्षण करणे हे लष्कराचे काम आहे, राजकारणात हस्तक्षेप करणे नाही. सरकार कोण स्थापन करेल आणि कोणाला सत्तेवरून हटवले जाईल, हे ठरवणे लष्कराचे काम नाही, असेही ते म्हणाले.
मनीर यांना राजकारणात यायचे असेल तर त्यांनी गणवेश उतरवून निवडणुका लढवाव्यात. सरकार स्थापन करणे किंवा पाडणे हे लष्कराचे काम नाही, असे त्यांनी म्हटले आहे. बलुचिस्तान आणि पश्तून भागांवर सरकारचे नियंत्रण कमकुवत झाले आहे आणि अलीकडेच या भागांमध्ये ५० हून अधिक मृतदेह सापडले आहेत.
दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या नावाखाली नागरिकांना शस्त्रे देण्याची किंवा सशस्त्र गट (मिलिशिया) स्थापन करण्याची मागणी चुकीची आहे, असेही रहमान म्हणाले. नागरिकांना शस्त्रे हस्तांतरित केल्याने अधिक रक्तपात आणि वैयक्तिक वैर निर्माण होण्याचा धोका असल्याने, आपण स्वतः सशस्त्र गट स्थापन करणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
फजलुर रहमान यांनी पुढे असा दावा केला की, बलुचिस्तानच्या मोठ्या भागावर आता पाकिस्तानी सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही. पश्तून भागातील परिस्थितीही सातत्याने बिघडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, गेल्या दोन-तीन दिवसांतच या भागात ५० हून अधिक मृतदेह सापडले आहेत.
रहमान यांनी आरोप केला की, तेथील लोकांना सुरक्षित वाटत नाही, मुले शाळेत जाऊ शकत नाहीत आणि मजूरसुद्धा आपली घरे सोडायला घाबरतात. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, लोकांना आपल्या प्रियजनांसाठी कफन विकत घेऊन त्यांना दफन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
रहमान यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानी सरकारने देशाच्या वाढत्या लोकसंख्येसंबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेल्या एका प्रमुख समितीत आसिम मुनीर यांचाही समावेश केला आहे. यामुळे लष्करप्रमुखांची भूमिका संरक्षणापलीकडे जाऊन नागरी प्रशासनापर्यंत विस्तारत असल्याबद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या वक्तव्यामुळे पाकिस्तानात लष्कराच्या राजकीय भूमिकेबद्दल सुरू असलेली चर्चा आणखी तीव्र होऊ शकते.




























































