
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या संभाव्य प्रत्यार्पणाच्या मागणीबाबत हिंदुस्थानने आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. शेख हसीना यांच्या प्रकरणात हिंदुस्थानच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नसून, प्रत्यार्पणाची कोणतीही मागणी आल्यास ती पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेनुसार हाताळली जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “या प्रकरणात आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. प्रत्यार्पणाशी संबंधित कोणतीही बाब ही कायदेशीर विषय आहे आणि त्यावर कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल.”
अवामी लीगच्या ७८ वर्षीय नेत्या शेख हसीना या जवळपास दोन वर्षांच्या निर्वासनानंतर पुन्हा बांगलादेशात परतण्याची तयारी करत असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून समोर आली आहे, या पार्श्वभुमीवर परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाला पुन्हा सक्रिय करण्याच्या उद्देशाने त्या मायदेशी परतण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, बांगलादेशच्या हंगामी सरकारने शेख हसीना यांच्या संभाव्य पुनरागमनाच्या वृत्ताचे स्वागत केले आहे. बांगलादेशचे पंतप्रधान सल्लागार (माहिती व धोरण) जाहेद उर रहमान यांनी पत्रकारांशी बोलताना, “आम्ही त्यांच्या परतण्याच्या घोषणेचे स्वागत करतो. त्यांना न्यायालयासमोर उभे राहावे लागेल आणि न्याय मिळालाच पाहिजे,” असे म्हटले.
रहमान म्हणाले की, देशातील जनतेला शेख हसीना यांच्यावर झालेली फाशीची शिक्षा कायम राहावी, अशी अपेक्षा आहे. त्यांनी जगातील सर्वोत्तम वकिलांची मदत घ्यावी, मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थी आंदोलनानंतर सरकार कोसळल्याने शेख हसीना यांनी ढाका सोडून हिंदुस्थानात आश्रय घेतला होता. तेव्हापासून त्या हिंदुस्थानात निर्वासित जीवन जगत आहेत.
नोव्हेंबर २०२५ मध्ये बांगलादेशातील विशेष न्यायाधिकरणाने २०२४ मधील आंदोलनादरम्यान आंदोलकांवर झालेल्या कथित कारवाईप्रकरणी मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपाखाली शेख हसीना यांना अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर बांगलादेशने अनेक वेळा हिंदुस्थानकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.
मात्र, शेख हसीना यांनी सर्व आरोप आणि न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावत हा खटला राजकीय हेतूने चालवला जात असल्याचा दावा केला आहे.





























































