मऊ आणि लुसलुशीत चपातीसाठी करण्यासाठी वापरा सोप्या टिप्स!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी जेवणात चपाती हा अत्यंत महत्त्वाचा आणि आवडता पदार्थ आहे. जवळपास प्रत्येक घरात दिवसातून एकदा किंवा दोनदा चपात्या बनवल्या जातात. गरमागरम आणि मऊ चपात्या जेवणाची चव वाढवतात, पण अनेकदा बनवल्यानंतर काही वेळातच त्या कडक होतात. यामुळे त्यांची चव आणि आकार दोन्ही बिघडता. विशेषतः जेव्हा त्या टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी पॅक केल्या जातात. कणीक (पीठ) योग्य पद्धतीने न मळणे, पीठ मळल्यानंतर ते काही वेळ न ठेवणे, चपाती जास्त वेळ किंवा खूप मोठ्या आचेवर शेकणे, ओलावा कमी असणे आणि योग्य पद्धतीने साठवून न ठेवणे ही यामागील मुख्य कारणे मानली जातात. याशिवाय, चपात्या जास्त वेळ उघड्या ठेवल्यानेही त्यातील ओलावा कमी होतो आणि त्या लवकर सुकू शकतात.

चपात्या दीर्घकाळ मऊ ठेवण्यासाठी या 5 टीप्स फॉलो करा

योग्य पद्धतीने कणीक मळा
चपातीचे पीठ नेहमी ताजे आणि गरजेनुसार पाणी घालून मळावे. पीठ जास्त कडक किंवा जास्त सैल नसावे. पीठ मळताना त्यात थोडे दूध, दही किंवा एक चमचा तेल घालू शकता. यामुळे चपात्या अधिक मऊ होतात आणि दीर्घकाळ मऊ राहण्यास मदत होते.

कणिक मळल्यानंतर काही वेळ झाकून ठेवा
कणिक मळल्यानंतर 20 ते 30 मिनिटे झाकून ठेवावे. यामुळे पीठ चांगले सेट होते आणि त्यात ओलावा टिकून राहतो. अशा पिठापासून बनवलेल्या चपात्या जास्त मऊ होतात आणि लवकर कडक होत नाहीत.

चपाती योग्य तापमानावर भाजा
चपाती नेहमी चांगल्या तापलेल्या तव्यावर मध्यम आचेवर शेकावी. खूप मोठ्या आचेवर चपाती लवकर जळू शकते आणि कमी आचेवर जास्त वेळ भाजल्याने ती सुकू शकते. योग्य तापमानावर भाजलेल्या चपात्या मऊ आणि चविष्ट बनतात .

चपातीला तूप किंवा लोणी लावा
चपाती तव्यावरून उतरवल्यानंतर लगेचच तिला हलके तूप किंवा लोणी लावा. यामुळे चपातीचा ओलावा कायम राहतो आणि ती तासनतास मऊ राहते.

चपाती हॉट केस किंवा कपड्यात गुंडाळून ठेवा
चपात्या बनवल्यानंतर त्या एका स्वच्छ सुती कपड्यात गुंडाळून हॉट केस किंवा झाकण असलेल्या भांड्यात ठेवाव्यात. यामुळे त्यांची ऊब आणि ओलावा टिकून राहतो. चपात्या जास्त वेळ उघड्या ठेवल्यास त्या लवकर सुकतात आणि कडक होतात.

चपात्या बनवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • चपात्या बनवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या पिठाचा वापर करा आणि ते ताजेच मळा.
  • पीठ मळताना ते गरजेपेक्षा जास्त सुके किंवा जास्त ओले ठेवू नका.
  • चपाती लाटताना जास्त सुके पीठ वापरणे टाळा, कारण यामुळे चपात्या सुक्या आणि कडक होऊ शकतात.
  • तवा चांगला तापल्यानंतरच चपाती शेका आणि जास्त वेळ गॅसवर ठेवू नका.
  • चपात्या शेकल्यानंतर लगेच झाकून ठेवा, जेणेकरून त्यातील मऊपणा कायम राहील.
  • टिफिनसाठी चपात्या बनवत असाल, तर त्या पूर्णपणे थंड होण्यापूर्वी हॉट केस किंवा स्वच्छ सुती कपड्यात बांधून ठेवा. यामुळे त्या दीर्घकाळ मऊ राहतील.