
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद–वाशिम मार्गावरील खंडाळा घाटात धावत्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीला मंगळवारी (दि. 14) रात्री साडेसातच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवाशांना वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच बसचा पुढील भाग आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम डेपोची एसटी वाशिमहून पुसदकडे प्रवाशांना घेऊन येत होती. खंडाळा घाटात बस भरधाव वेगात असताना चालकाच्या निदर्शनास स्टेअरिंगजवळून धूर निघत असल्याचे आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. चालक आणि वाहकाने क्षणाचाही विलंब न करता सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून खाली उतरविले. प्रवासी खाली उतरताच काही क्षणांतच बसने पेट घेतला. आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण पुढील भाग ज्वाळांनी वेढला गेला. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी हा थरार उघड्या डोळ्यांनी पाहिला.
खंडाळा घाटात धावत्या एसटीला भीषण आग; चालक-वाहकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचलेhttps://t.co/wTCVYkTK6a pic.twitter.com/I0OK8izwm9
— Saamana Online (@SaamanaOnline) July 15, 2026
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

























































