
वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच, सॅन दिएगो झू सफारी पार्कमध्ये एका 12 वर्षांच्या ‘मिझानी’ नावाच्या गोरिलावर अतिशय कठीण अशी कवटीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गोरिला प्रजातीमध्ये झालेली ही जगातील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
मार्च 2026 मध्ये मिझानीच्या वागण्यात बदल जाणवू लागला होता. तो नीट जेवत नव्हता, त्याचे तोंड पूर्ण उघडत नव्हते आणि त्याला खूप डोकेदुखी होत असावी असे दिसत होते. डॉक्टरांनी सीटी स्कॅन केला असता, मिझानीला ‘सायनुसायटिस’ आणि ‘मॅस्टॉइडायटिस’ झाल्याचे निदान झाले. कानाच्या मागील हाडाला झालेला हा गंभीर संसर्ग हळूहळू त्याच्या कवटीपर्यंत पसरला होता. जर ही शस्त्रक्रिया केली नसती, तर मिझानीचा जीव धोक्यात आला असता. गोरिलावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी कोणतीही नोंद वैद्यकीय इतिहासात नव्हती. ही कठीण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्य आणि यूसी सॅन दिएगो हेल्थच्या मानवी तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन एक विशेष टीम तयार केली. यात डॉ. जेफ्री हॅरिस आणि डॉ. ख्रिस सुरेश यांसारख्या अनुभवी शल्यचिकित्सकांचा समावेश होता.
डॉक्टरांनी सीटी स्कॅनचा सखोल अभ्यास करून शस्त्रक्रियेची नवीन पद्धत शोधून काढली. शस्त्रक्रियेच्या दिवशी 20 हून अधिक तज्ज्ञांच्या टीमने मिझानीवर उपचार केले. डॉक्टरांनी मिझानीच्या डोक्याच्या डाव्या बाजूला छेद देऊन संसर्ग झालेला भाग काळजीपूर्वक काढून टाकला. तब्बल 5 तास चाललेली ही शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली. मानवी डॉक्टरांचा अनुभव आणि पशुवैद्यकीय टीमच्या प्रसंगावधानामुळे मिझानीला नवजीवन मिळाले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.


























































