
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमध्ये धक्कदायक प्रकार समोर आला आहे. शेती आणि मॅजिक व्हॅन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या व्यक्तीला आयकर विभागाने 41 कोटी रुपयांच्या व्यवहारप्रकरणी 6 कोटी रुपयांची बजावली आहे. श्याम बाबू असे नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या नोटीस प्रकरणी श्याम बाबू आयकर विभागाच्या फेऱ्या मारत आहेत.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मिर्झापूर जिल्ह्यातील लोकापूर गावात राहणारे श्याम बाबू कुटुंबासोबत शेती करतात आणि मॅजिक व्हॅन चालवून दिवसाला जेमतेम 400 ते 500 रुपये कमावतात. त्यांचे लग्न 2020 मध्ये झाले. लग्नानंतर काही महिन्यांनी त्यांच्या मेहुण्याने नोकरीचे आमिष दाखवून त्यांना दिल्लीला बोलावले. दिल्लीत गेल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करून मेहुण्याने श्याम बाबूचे बँक खाते उघडले. मात्र बँकेच्या फॉर्मवर मेहुण्याने आपला मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर चेकबुकवर श्याम बाबूची सही घेऊन कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले.
तीन महिन्यांपूर्वी श्याम बाबू यांना आयकर विभागाची नोटीस आली. त्यांच्या खात्यातून 41 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. आतापर्यंत आयकर विभागाकडून तीन नोटिसा मिळाल्या आहेत. या व्यवहारासाठी श्याम बाबू यांच्याकडून 6 कोटी रुपयांचा कर आकारण्यात आला आहे. श्याम बाबू यांनी याबाबत सासरच्या मंडळींना आणि मेहुण्याला सांगितले असता, त्यांनी काहीच होणार नाही सांगत त्याला गप्प बसायला सांगितले.
पीडित श्याम बाबू आता आयकर विभागाकडे फेऱ्या मारत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि आपल्या फसवणूक करणाऱ्या मेहुण्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहे.































































