
रस्त्याची बोगसगिरी आणि पुलाच्या कामात लागलेली वाट संपूर्ण बीड जिल्ह्याने अनुभवली. ४८ लाख रूपयाचा पूल एका लाथेत पडला. ‘सामना’ च्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी चौकशीसाठी बनकरंज्यात दाखल झाले. कंत्राटदाराला बोलावण्यात आले. पण अधिकार्याचा धाक उरलाय कुठं? अधिकार्यांसमोरच गुत्तेदार म्हणतोय, अजून काम कुठं पूर्ण झालंय? संतप्त झालेल्या अधिकार्याने कंत्राटदारांना झापले. संपूर्ण काम गुणवत्तेत झाल्याशिवाय बील काढणार नसल्याची तंबी दिली.
केज तालुक्यातील बनकरंजा येथील बांधण्यात आलेला ४८ लाख रूपयाचा पूल कसा बोगस निघाला. हे त्या गावच्या दुर्गादास लांब या तरूणाने दाखवून दिले. एका लाथेत हा पूल पाडल्याचे वृत्त ‘सामना’ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर संपूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले. दुसर्याच दिवशी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले. जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव थेट बनकरंज्यात दाखल झाले. गावकर्यांच्या समक्ष त्यांनी पुलाची पाहणी केली.
पाहणी करत असताना पुलाचे काम करणार्या कंत्रादारालाही पाचारण करण्यात आले. गुत्तेदाराला गावकर्यांनी या कामात इस्टीमेट प्रमाणे स्टील वापरले नाही. संपूर्ण पूल स्टील न वापरता करण्यात आला असे तोंडावर सांगितल्यावर निर्लज्ज गुत्तेदार अधिकार्यांसमोरच अजून काम पूर्ण झालंय कुठं? असा प्रतिप्रश्न उपस्थित करून लागला. गुत्तेदाराच्या या बोलण्यावरूनच अधिकार्यांचा धाक उरलाय की नाही असा सवाल उपस्थित होतो.
संपूर्ण पुलाचे काम झाल्यानंतर आता स्टील कुठं वापरणार हा प्रश्न पडला आहे. मग संतप्त झालेल्या अधिकार्यांनी गुत्तेदाराला झापले. कामाचा अहवाल तातडीने वरिष्ठ अधिकार्यांना सादर केला जाणार आहे. पुलाचे काम गुणवत्तेतच झाले पाहिजे नसता कामाचे बील अदा केले जाणार नसल्याची तंबीही अधिकार्यांनी दिली.





























































