
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी रत्नागिरी शहरातील श्रीराम मंदिरात रामरक्षा आंदोलन करण्यात आले.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देश-विदेशातील रामभक्तांनी देणगी दिली. भक्तीभावाने दिलेल्या देणगीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. श्रीराम मंदिरातील चोरीचे प्रकरण उघडकीस येताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेने राज्यभर रामरक्षा आंदोलन सुरू केले आहे. रत्नागिरीतील श्रीराम मंदिरात शिवसेनेने रामरक्षा आंदोलन केले. श्रीराम मंदिरात शिवसैनिकांनी रामरक्षा पठण केले. यावेळी रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे,तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील,शहरप्रमुख प्रशांत साळुंखे,महिला शहर संघटक सरोज बारोटे,माजी नगरसेविका रशिदा गोदड,प्रतिमा साळुंखे, विभागप्रमुख किरण तोडणकर,प्रकाश सुर्वे,संदेश भिसे,प्रकाश गुरव,दिलावर गोदड,शरद राणे,माजी सरपंच दीपक सुर्वे, माजी नगरसेवक सलील डाफळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हिंदुत्वाच्या नावाखाली हा मोठा भ्रष्टाचार- प्रमोद शेरे
अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यासाठी प्रत्येकाने भक्तिभावाने देणगी दिली होती.अयोध्येतील श्रीराम मंदिरातील सोन्या-चांदीच्या विटा,हिरे-माणके आणि पैसे चोरण्यात आले आहेत.हिंदुत्वाच्या नावाखाली हा मोठा भ्रष्टाचार झाला आहे.आमचं हिंदुत्व कट्टर आहे. आम्ही प्रभू श्रीराम आणि मारूतीरायाकडे हात जोडून प्रार्थना केली की या सर्व चोरट्यांचा सर्वनाश कर, असे शिवसेनेचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे यांनी सांगितले.




























































