
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील पासपोर्ट कार्यालयाला गुरुवारी सकाळी बॉम्बची धमकी मिळाली. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली. बॉम्बच्या धमकीचा मेल मिळाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) तातडीने घटनास्थळी दाखल होत कसून तपासणी केली.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी संपूर्ण कार्यालयीन इमारत आणि परिसराची पाहणी केली. मात्र, या तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक पदार्थ आढळले नाहीत. पोलिसांनी धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.




























































