हिंगोली जिल्हा हादरला! कळमनुरीत गावठी कट्ट्यातून गोळीबार; एक जण ठार, 7 संशयित ताब्यात, शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळमनुरी येथील बसस्थानक परिसरात बुधवारी रात्री 11 ते 11.30 च्या सुमारास दोन गटांत झालेल्या किरकोळ हाणामारीनंतर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या थरारक घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी झाले आहेत. लुकमान सिद्दीकी (वय – 38) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी रात्रीपासूनच शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी शहरातील इंदिरानगर आणि पठाण मोहल्ला भागातील काही तरुणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोन्ही गट बसस्थानक परिसरात आमने-सामने आले. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी किरकोळ हाणामारी झाली. मात्र, वाद विकोपाला गेल्याने एका गटातील तरुणांच्या टोळक्याने गावठी कट्टा काढून थेट गोळीबार केला.

या गोळीबारात लुकमान सिद्दीकी यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओसामा सिद्दीकी, सारिया सिद्दीकी, इम्रान पठाण आणि मेहराज सिद्दीकी हे चारजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यातील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जमीर नाईक, सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे आणि रघुनाथ शेवाळे यांच्यासह पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले आणि पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे यांनीही रात्रीच घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

याप्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत आतापर्यंत सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनेतील इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या शहरात शांतता असून पोलीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.