
महाराष्ट्राच्या दुग्ध व्यवसायाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिह्यात जून महिन्यात दूध संकलनात लक्षणीय घट झाल्याने दुग्ध व्यवसायासमोरील आव्हाने पुन्हा ऐरणीवर आली आहेत. राज्यातील एकूण दूध उत्पादनापैकी सुमारे ३५ टक्के दूध उत्पादन एकट्या अहिल्यानगर जिह्यात होत असल्याने उत्पादनातील घट ही केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित नसून, राज्याच्या दुग्ध अर्थकारणासाठीही चिंतेची बाब मानली जात आहे.
दुग्ध विकास प्रकल्प अधिकारी गिरीश सोनोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी मे महिन्यानंतर जूनमध्ये दूध संकलनात घट होण्याचा कल कायम आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली असून, मे महिन्यातील ४८.३२ लाख लिटर संकलन जूनमध्ये ४६.८१ लाख लिटरवर घसरले आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये सुमारे दीड लाख लिटरची घट नोंदविण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक दूध उत्पादकांच्या मते ही घट आणखी मोठी असून, दररोज जवळपास दोन लाख लिटर दूध संकलन कमी होत आहे.
शेतकरी नेते रवी मोरे यांनी सांगितले की, दुधातील फॅटचे प्रमाण ८.२ पेक्षा कमी असल्यास अनेक दूध संघ दूध स्वीकारत नाहीत. त्यामुळे हजारो दूध उत्पादकांचे दूध परत जात असून, त्याचा आर्थिक फटका शेतकर्यांना बसत आहे. महागडा चारा, वाढलेले पशुखाद्य आणि औषधोपचाराचा खर्च सहन करूनही दूध नाकारले जात असल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
दुसरीकडे दूध पावडर प्रकल्पांकडून मागणी वाढल्यास जिह्याबाहेरूनही दूध आणण्याची वेळ येत असल्याची माहिती दुग्ध विकास विभागाने दिली आहे.
महिनानिहाय दूध
संकलन (लाख लिटरमध्ये)
जानेवारी ४८.२०
फेब्रुवारी ४६.२७
मार्च ४६.८६
एप्रिल ४६.८५
मे ४८.३२
जून ४६.८१
































































