लातूरचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये मृतदेह आढळला, भुलीचे इंजेक्शनही सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरातील हृदयरोगतज्ज्ञ मेहुल राठोड यांचा मृतदेह आज सायंकाळच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई रस्त्यावरील कारमध्ये आढळून आला. डॉक्टर मेहुल राठोड यांनी आत्महत्या केली, की त्यांचा खून करण्यात आला, याची चर्चा सर्वत्र सुरू होती. कारमध्ये भुलीचे इंजेक्शन सापडले आहे. त्यांना रुग्णालयात नेले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लातूर अंबाजोगाई महामार्गावर एका थांबलेल्या कारमध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड (वय ४३) बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. मेहुल यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू करण्यापूर्वीच ते मृत्यू पावले असल्याचे जाहीर करण्यात आले. डॉ. मेहुल राठोड यांच्या कारमध्ये इंजेक्शन आढळून आले असून, त्यांनी भुलीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूमागचे खरे कारण स्पष्ट होईल.

डॉ. मेहुल राठोड हे सकाळी ११ वाजता घराच्या बाहेर पडले होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची कार अंबाजोगाई रोडवर उभी असल्याचे समजले. कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. कारमध्ये काही इंजेक्शन सापडले आहेत, परंतु ते त्यांनी घेतले किंवा नाही हे शवविच्छेदन अहवालात समजून येईल.

डॉ. मेहुल राठोड हे शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ म्हणून परिचित होते. डॉ. मेहुल यांच्या पश्चात आई मीनाताई राठोड, पत्नी कॅन्सर सर्जन डॉ. प्रियंका राठोड आणि ६ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.