
उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एका उच्चभ्रू सोसायटीत अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या (एओए) दोन माजी पदाधिकाऱ्यांमध्ये लिफ्टच्या आत जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीएस-7 या सोसायटीमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडल्याचे वृत्त ‘इंडिया टूडे‘ने दिले आहे.
प्रल्हाद कुमार आणि दीपक चोप्रा दोन माजी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही लिफ्टमधून जात असताना त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची सुरू झाली. पाहता पाहता शाब्दिक वाद गुद्द्यांवर आला आणि नंतर थेट हाणामारी सुरू झाली. सुरुवातीला एका व्यक्तीने दुसऱ्यावर हात उचलला, त्यानंतर दोघांनीही एकमेकांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, असे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
गाझियाबाद येथील एका उच्चभ्रू सोसायटीत अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या (एओए) दोन माजी पदाधिकाऱ्यांमध्ये लिफ्टच्या आत जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. pic.twitter.com/SoMNqMAnRY
— Saamana Online (@SaamanaOnline) July 16, 2026
दरम्यान, या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तांत्रिक घोळही समोर आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला 15 जुलै 2026 ही योग्य तारीख दिसत असली, तरी काही सेकंदांनंतर ती थेट 1 जानेवारी 2004 अशी बदललेली दिसते. सीसीटीव्ही यंत्रणेतील तांत्रिक त्रुटी किंवा डिव्हाइस रिसेट झाल्यामुळे हा प्रकार घडला असावा, असा अंदाज आहे.
नेमका वाद काय?
स्थानिक रहिवाशांच्या मते, या दोन्ही माजी पदाधिकाऱ्यांमध्ये असोसिएशनच्या कामांवरून आणि इतर मुद्द्यांवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद धुमसत होता. हाच जुना वाद बुधवारी सकाळी अचानक विकोपाला गेला आणि त्याचे पर्यवसान थेट लिफ्टमधील हिंसक हाणामारीत झाले. दरम्यान, या घटनेनंतर दीपक चोप्रा यांनी तातडीने क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार मिळाल्याची पुष्टी केली असून व्हायरल फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.





























































