श्री अंबाबाई मंदिर संवर्धन कामाची शास्त्रोक्त अंमलबजावणी करा – इंद्रजीत सावंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर जतन व संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामांची पद्धत आणि दर्जा यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या भावना पाहता या सर्व कामांची शास्त्रोक्त पद्धतीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी मंगळवारी सायंकाळी मंदिरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या. राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असले तरी त्या विभागाकडून कामावर नियमित देखरेख करण्यासाठी कोणताही तज्ञ अधिकारी प्रत्यक्षस्थळी उपलब्ध नव्हता. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडेही मंदिराच्या जतन व संवर्धन कामासंदर्भातील नकाशे, कामाची पद्धत, तांत्रिक माहिती वा संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे दिसून आले.कामादरम्यान परिसरातील शिलालेखांच्या संरक्षणाची योग्य ती काळजी घेतलेली दिसून येत नाही.

श्री अंबाबाई मंदिराबाबत असलेल्या तीव्र लोकभावना लक्षात घेता शासनाने केवळ राज्य पुरातत्त्व विभागातील एका अधिकार्‍यावर अवलंबून न राहता कोल्हापूर तसेच इतर भागांतील वास्तू संवर्धन, पुरातत्त्व, स्थापत्य, शिल्पकला आणि इतिहास क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन करून कामावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे दिलीप देसाई, इंद्रजित सावंत ओंकार कोळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.