
कर्नल अभय बा. पटवर्धन (निवृत्त)
जनरल धीरज सेठ भारतीय स्थलसेनेचे एकतीसावे लष्करप्रमुख आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचे व्यवस्थापन, बहुक्षेत्रीय युद्धतंत्राचा स्वीकार, थिएटर कमांडची अंमलबजावणी आणि संरक्षण अर्थसंकल्पातील मर्यादा यांचा विचार करता त्यांच्यासमोरील जबाबदाऱ्या अधिक व्यापक ठरतात. त्यांच्यासमोर स्थलसेनेला अधिक चपळ, एकात्मिक, आत्मनिर्भर आणि बहु-क्षेत्रीय युद्धासाठी सक्षम दलामध्ये रूपांतरित करण्याचे आव्हान आहे. भविष्यातील युद्धभूमीवर विजय हा शस्त्रांच्या संख्येबरोबरच माहितीवरील नियंत्रण, निर्णयक्षमता, वेग आणि अचूकता यांवर ठरणार आहे.
आज भारतासमोर अत्यंत गुंतागुंतीचे आणि वेगाने बदलणारे सामरिक वातावरण उभे आहे. भारतीय स्थलसेना एका पारंपरिक लष्करी दलापासून बहुक्षेत्रीय, तंत्रज्ञानसक्षम आणि एकात्मिक राष्ट्रीय शक्तीच्या प्रभावी साधनामध्ये रूपांतरित होत असताना हा संक्रमणाचा कालखंड अधिक महत्त्वाचा ठरत आहे. अशा निर्णायक क्षणी जनरल धीरज सेठ यांनी भारतीय स्थलसेनेचे एकतीसावे सेनाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.
नव्या सेनाध्यक्षांसमोर केवळ नेतृत्वाचे नव्हे, तर परिवर्तनाचेही मोठे आव्हान असेल. वाढत्या सुरक्षा गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर स्थलसेनेचे कार्यान्वयन, संरचनात्मक पुनर्रचना, तांत्रिक आधुनिकीकरण आणि मर्यादित संसाधनांचे परिणामकारक व्यवस्थापन यांचा समतोल साधावा लागणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचे व्यवस्थापन, बहुक्षेत्रीय युद्धतंत्राचा स्वीकार, थिएटर कमांडची अंमलबजावणी आणि संरक्षण अर्थसंकल्पातील मर्यादा यांचा विचार करता त्यांच्यासमोरील जबाबदाऱ्या अधिक व्यापक ठरतात.
भारतासमोर सध्या दुहेरी सामरिक आव्हान उभे आहे. चीन सध्या तुलनेने संयमित भूमिका घेत असल्याचे दिसत असले तरी त्याची लष्करी आणि तांत्रिक प्रगती सातत्याने सुरू आहे. अचूक मारा, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वायत्त शस्त्रप्रणाली, सायबर क्षमता आणि बहुक्षेत्रीय एकात्मिक युद्धतंत्र यांवर आधारित त्याचे धोरण भविष्यातील युद्धाचे स्वरूप निश्चित करत आहे.
दुसरीकडे, मध्यपूर्वेतील घडामोडींमध्ये मध्यस्थीची भूमिका मिळाल्यानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येते. विशेषतः फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी ऑपरेशन बुनयान-उल-मर्सूसच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त केलेली विधाने आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सिंधू जल कराराच्या संदर्भात दिलेली युद्धाची अप्रत्यक्ष धमकी भारतासाठी गंभीर संकेत मानावे लागतील.
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची युद्धसंकल्पना वेगळी असली तरी त्यांचा उद्देश भारतावर सामरिक दबाव निर्माण करणे हाच आहे. चीन बुद्धिमान युद्धतंत्र, अचूक लक्ष्यभेदन आणि बहु-क्षेत्रीय एकात्मिक मोहिमांवर भर देत आहे, तर पाकिस्तान विषम संसाधने, ड्रोन, प्रॉक्सी गट आणि आयातित शस्त्रप्रणालींच्या सहाय्याने संकरित युद्धाची रणनीती अवलंबत आहे. या दोन्ही आव्हानांना उत्तर देण्यासाठी भारताला पारंपरिक युद्धतत्त्वांच्या पलीकडे जाऊन धाडसी लष्करी पुनर्रचना स्वीकारावी लागेल. भविष्यातील युद्धात अवजड आणि स्थिर तैनातीपेक्षा हलक्या, चपळ आणि एकात्मिक युद्धगटांचे महत्त्व वाढणार आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिथे पर्याय उपलब्ध आहेत, तिथे मानवी संसाधनांवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक ठरेल. मानवरहित शस्त्रप्रणाली, रोबोटिस, विशेष मोहिमा, विशेष दल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर भारतीय स्थलसेनेची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढवू शकतो. भविष्यातील रणांगणात सैनिकांची संख्या नव्हे, तर माहितीवरील नियंत्रण, निर्णयाचा वेग आणि लक्ष्यभेदनाची अचूकता निर्णायक ठरणार आहे. 2025 मधील ‘ऑपरेशन सिंदूर’ने या बदलत्या वास्तवाची स्पष्ट जाणीव करून दिली. शत्रूच्या भूभागात मोठय़ा प्रमाणावर सैन्य न पाठवता अचूक मारा, मानवरहित प्रणाली आणि एकात्मिक कमांड नेटवर्कच्या सहाय्याने उद्दिष्ट साध्य करता येते, हे या मोहिमेतून दिसून आले. त्यामुळे नव्या सेनाध्यक्षांना ड्रोन, अचूक शस्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती-आधारित निर्णय प्रक्रियेचे स्थलसेनेत वेगाने एकीकरण करावे लागेल. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य देणेही आवश्यक ठरेल.
संरक्षण अर्थसंकल्पातील मर्यादा हे आणखी एक गंभीर वास्तव आहे. वेतन, निवृत्तीवेतन आणि प्रशासकीय खर्चामुळे आधुनिकीकरणासाठी उपलब्ध निधी तुलनेने मर्यादित राहतो. कार्यान्वयन खर्च, रसद व्यवस्था, कल्याणकारी सुधारणा, माजी सैनिकांचे प्रश्न, वन रँक वन पेन्शन योजना आणि वैद्यकीय सुविधांशी संबंधित आर्थिक जबाबदाऱ्या यांचाही विचार करावा लागतो. या परिस्थितीत उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त परिणामकारक वापर करणे ही सेनाध्यक्षांसमोरील मोठी कसोटी असेल.
भारतीय संरक्षण व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच्या बदलांपैकी एक म्हणजे थिएटरायझेशनची संकल्पना. उत्तर, पश्चिम आणि पूर्व या एकात्मिक थिएटर कमांडच्या माध्यमातून स्थलसेना, नौदल आणि वायुसेना यांच्यात अधिक समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रक्रियेत विद्यमान कमांड संरचनेची पुनर्रचना, संसाधनांचे पुनर्वाटप आणि संयुक्त कार्यपद्धती विकसित करावी लागणार आहे. चिलखती दलातील अधिकारी म्हणून जनरल धीरज सेठ यांचा अनुभव या संक्रमणासाठी उपयुक्त ठरेल. त्यांनी वाळवंटी भागात आर्मर्ड रेजिमेंटचे नेतृत्व केले असून पश्चिम आघाडीवरील आर्मर्ड ब्रिगेड आणि जम्मू-कश्मीरमधील राष्ट्रीय रायफल्स क्षेत्रातही त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे. सुदर्शन चक्र कोअर, दिल्ली क्षेत्र, दक्षिण-पश्चिम कमांड आणि दक्षिण कमांडमधील त्यांचा अनुभव त्यांना व्यापक दृष्टी प्रदान करतो.
आजचे रणांगण केवळ भूसीमांपुरते मर्यादित राहिलेले नाही. सायबर क्षेत्र, अवकाश, माहिती युद्ध आणि विद्युतचुंबकीय क्षेत्र यांमध्येही संघर्ष सुरू असतो. त्यामुळे सिद्धांत, संघटना, तंत्रज्ञान आणि लष्करी संस्कृती यांची मूलभूत पुनर्कल्पना अपरिहार्य ठरते. 2026 हे वर्ष भारतीय स्थलसेनेने नेटवार्ंकग आणि डेटा केंद्रीकरण वर्ष म्हणून घोषित केले आहे. निर्णय प्रक्रियेला वेग देण्यासाठी आणि सर्व स्तरांवर कृतीयोग्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी डेटा वर्चस्व हे भविष्यातील युद्धातील प्रमुख शस्त्र ठरणार आहे.
याच अनुषंगाने आयडेस, आदिती आणि आर्मी डिझाइन ब्युरोसारख्या स्वदेशी उपक्रमांचा प्रभावी वापर करून संरक्षण पुरवठा साखळी अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनवावी लागेल. बहुआघाडीच्या युद्धाची शक्यता, सीमापार दहशतवाद, घुसखोरी, अंतर्गत सुरक्षा आव्हाने आणि नागरी प्रशासनाला द्यावी लागणारी मदत यामुळे स्थलसेनेवरील ताण वाढत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाधारित आणि जलद प्रतिसाद देणारी संरचना निर्माण करणे काळाची गरज ठरत आहे. जनरल धीरज सेठ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्थलसेनेसाठी हा केवळ नेतृत्वबदलाचा क्षण नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. त्यांच्यासमोर स्थलसेनेला अधिक चपळ, एकात्मिक, आत्मनिर्भर आणि बहु-क्षेत्रीय युद्धासाठी सक्षम दलामध्ये रूपांतरित करण्याचे आव्हान आहे. त्यासाठी अपारंपरिक विचार, संस्थात्मक चपळता आणि राष्ट्रीय मूल्यांप्रती अढळ बांधिलकी आवश्यक असेल. भविष्यातील युद्धभूमीवर विजय हा शस्त्रांच्या संख्येवर नव्हे, तर माहितीवरील नियंत्रण, निर्णयक्षमता, वेग आणि अचूकता यांवर ठरणार आहे. भारतीय स्थलसेनेच्या या परिवर्तनाच्या प्रवासात जनरल धीरज सेठ यांना यश लाभावे, हीच अपेक्षा.


























































