
संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमेटशन) विधेयकाला इंडिया आघाडीशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परस्पर पाठिंबा देणार नाही, असे पक्षाच्या कार्याध्यक्ष-खासदार सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्ट केले.
डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्याने सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. अशा अफवांमुळे आघाडीमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून आपणच याबाबत खुलासा करत आहोत असे सांगताना, शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि सतेज पाटील यांच्याशीही आपण चर्चा करून वस्तुस्थिती सांगितली असल्याचे त्या म्हणाल्या. डिलिमिटेशन विधेयक अद्याप आमच्या हाती आले नसून ते आल्यानंतर त्यावर अभ्यास करूनच राष्ट्रवादी काँग्रेस पुढील भूमिका स्पष्ट करेल, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्यक्षात विधेयक संसदेत आले तेव्हा त्यात 50 टक्क्यांची अटच नसल्याने विरोधकांनी आवाज उठवला. त्यावर अमित शहा यांनी आपण तातडीने तशी दुरुस्ती करून विधेयक पुन्हा आणू असे सांगितले, पण ते अद्याप आलेले नाही!





























































