
जुहू चौपाटी कचऱ्याने भरून गेली आहे. जुहू चौपाटीवरील कचऱ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पालिका प्रशासन कामाला लागले आहे. पालिकेने जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे. सुमारे सात किलोमीटर लांबीच्या जुहू चौपाटीवर सध्या दररोज जवळपास 350 मेट्रिक टन कचरा किनाऱ्यावर वाहून येत आहे. पालिकेतर्फे दररोज सुमारे 180 मेट्रिक टन कचरा हटविण्यात येत आहे. मागील दहा दिवसांत सुमारे 1 हजार 800 मेट्रिक टन कचरा हटवून त्याची शास्त्राsक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे, असा दावा पालिकेने केला आहे.
मुंबईतील चौपाटय़ा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेने अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री तैनात केली आहे. यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काळात एक हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने लहान नाले आणि नैसर्गिक जलवाहिन्यांमधील तरंगता कचरा अरबी समुद्रात वाहून गेला होता. भरतीच्या लाटांमुळे हाच कचरा आता पुन्हा किनाऱ्यावर येत आहे. त्यामुळे स्वच्छता व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. मात्र अशा परिस्थितीतही घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे अतिरिक्त यंत्रणा उभी करून किनारा स्वच्छतेवर भर दिला जात आहे, असा दावा पालिकेने केला आहे.
मुंबईतील नागरिक तसेच समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांनी स्वच्छता मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे. समुद्रकिनारा किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे विशेषतः पावसाळ्यात नाले आणि जलवाहिन्यांमध्ये कचरा जाणार नाही, याची खबरदारी घेणे असे आवाहन उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी केले आहे.































































