FIFA World Cup 2026 – वर्ल्ड कप अमर है…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्कोअरबोर्ड हा फुटबॉलचा चार्टर्ड अकाऊंटंट असतो. त्याला फक्त जमा-खर्च कळतो. इतिहास मात्र कवी असतो. तो आकडे लिहित नाही, माणसं लिहितो. वर्ल्ड कप संपला की फिफाच्या वहीत एकच नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जातं. पण चाहत्यांच्या वहीत तसं नसतं. तिथे अनेक नावं असतात. काही ट्रॉफी उचलणाऱ्यांची… तर काही अश्रू पुसणाऱ्यांची.

2026 च्या वर्ल्ड कपमध्ये हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ट्रॉफी अजून कुणाच्या हातात गेली नाही. पण काही संघांनी आधीच लाखो हृदयांवर कब्जा केला आहे. या सर्वात आधी नाव येतं इजिप्तचे. अर्जेंटिनाविरुद्ध 2-0 अशी घेतलेली आघाडी कुणीही विसरू शकणार नाही. समोर मेस्सीचा संघ होता. जगभरच्या टीव्हीसमोर बसलेल्या लोकांनी रिमोट खाली ठेवला होता. काहीतरी मोठं घडतंय, अशी चाहूल लागली, पण फुटबॉल देवाला बहुधा थरार लिहिण्याचाच छंद असावा. सामना फिरला. अर्जेंटिना 3-2 ने जिंकला.

तेव्हा स्कोअरबोर्ड म्हणाला, अर्जेंटिना पुढे गेला. इतिहास मात्र कुजबुजला, इजिप्त हरला नाही, त्याचं स्वप्न थोडंसं उशिरा जागं झालं.

काही पराभव असे असतात की, त्यांना पराभव म्हणणं अन्याय ठरतो. ते अपूर्ण राहिलेल्या कवितांसारखे असतात. मोरोक्कोची गोष्ट आणखी वेगळी ठरते.

2022 मध्ये त्यांनी जगाला सांगितलं होतं की आफ्रिका फक्त ताल धरत नाही, ती सूरही लावते. अनेकांना वाटलं, तो एकदाच घडलेला चमत्कार होता. पण यंदा त्यांनी पुन्हा नेदरलँड्सला बाहेरचा रस्ता दाखवला, कॅनडावर दणदणीत विजय मिळवला आणि पुन्हा मोठ्या संघांना घाम पह्डला. आफ्रिकेकडे पूर्वी युरोप थोड्या कौतुकाने पाहायचा. आता थोडया भीतीने पाहतो. फुटबॉलमधला हा सर्वात मोठा बदल आहे.

काबो व्हर्डेची स्टोरी तर एखाद्या जुन्या मराठी सिनेमासारखीच आहे. नायकाकडे पैसा नसतो, ओळखी नसतात, पण छाती मात्र अफाट असते. लोकसंख्या मुंबईच्या एका पालिका वॉर्डएवढी. साधनं मर्यादित, पण अर्जेंटिनासारख्या महासत्तेला अतिरिक्त वेळ खेळायला भाग पाडलं. हरले खरे,  पण अर्जेंटिनालाही पूर्ण श्वास घेऊ दिला नाही. मोठय़ा संघांना हरवणं हा पराक्रम असतो. मोठय़ा संघांना घाम फोडणं ही कलाच असते आणि काबो व्हर्डेकडे ती कला होती.

नॉर्वेने तर या वर्ल्ड कपची स्क्रिप्टच बदलून टाकली. ब्राझीलला घरी पाठवणं म्हणजे वानखेडेवर मुंबईला हरवण्याइतपं अवघड काम, पण त्यांनी ते केलं. इंग्लंडविरुद्धही शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अतिरिक्त वेळेत पराभव झाला, पण मैदान सोडताना त्यांच्या डोळ्यांत पराभव नव्हता, तर ‘पुढच्या वेळी पुन्हा येऊ’ हा हट्ट होता.

खेळात काही संघ जिंकतात.

काही संघ भविष्य जिंकतात.

नॉर्वेने दुसरं काम केलं.

आपण चित्रपट पाहायला जातो तेव्हा शेवट माहीत असतो. हीरो जिंकणारच. तरीही तीन तास थिएटरमध्ये बसतो. कारण आपल्याला शेवटापेक्षा प्रवास आवडतो.

वर्ल्ड कपचंही तसंच आहे.

कप कोण जिंकणार, यापेक्षा वाटेत कोण-कोण भेटलं, याला जास्त किंमत असते.

इजिप्तचे अश्रू… मोरोक्कोचा अभिमान… काबो व्हर्डेचं धाडस…नॉर्वेचा हट्ट…

या चार कथा कोणत्याही सुवर्णपदकापेक्षा कमी नाहीत.

फिफा सर्वाधिक गोल करणाऱयाला ‘गोल्डन बूट’ देते. सर्वोत्तम खेळाडूला ‘गोल्डन बॉल’ देते. सर्वोत्तम गोलरक्षकाला ‘गोल्डन ग्लोव्हज’ देते, पण मला वाटतं, एक पुरस्कार अजून हवा… गोल्डन स्टोरी. ज्या संघाने जगाला सर्वात सुंदर कथा दिली, त्याच्यासाठी. कारण चार वर्षांनी लोकांना अंतिम सामन्याचा स्कोअर गुगलवर शोधावा लागेल, पण इजिप्तच्या डोळ्यातलं पाणी, मोरोक्कोच्या चाहत्यांचा जल्लोष, काबो व्हर्डेचं निर्भीड हास्य आणि नॉर्वेचा न झुकणारा स्वभाव, ही चित्रं कुणालाच शोधावी लागणार नाहीत. ती आधीच फुटबॉलप्रेमींच्या मनात कायमची सेव्ह झाली आहेत. कोरली गेलीत.

विश्वचषकाची खरी ओळख कपमध्ये नसते… ती या कथांमध्येच असते, ज्या पराभवातही विजय शोधायला शिकवतात. म्हणूनच शेवटी एकच वाक्य मनात घुमत राहतं, गोल सामना जिंकतात… पण गोष्टी वर्ल्ड कप अमर करतात. म्हणूनच हा वर्ल्ड कप अमर है.