
पालिकेच्या कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता छाया शिंदे यांच्या मनमानी कारभारावर स्थायी समितीत आज तीव्र नाराजी व्यक्त झाली. रुग्णालयाचे अधिष्ठाता लोकप्रतिनिधींचे दूरध्वनी स्वीकारत नसल्याचा आरोप करत त्यांना समितीसमोर बोलावण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत कूपर रुग्णालयाचे डीन स्थायी समितीसमोर येऊन खुलासा करत नाहीत तोपर्यंत त्यांचा एकही प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले.
कूपर रुग्णालयाच्या उपकरणांचा प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर आला होता. त्यावर झालेल्या चर्चेत शिवसेना नगरसेवक यशोधर फणसे आणि अन्य नगरसेवकांनी डीन यांच्या वागण्यावर संताप व्यक्त केला. यशोधर फणसे म्हणाले, कूपरचे डीन नगरसेवकांनी संपर्क साधूनही फोन उचलत नाहीत. काही दिवसांपूर्वी न्यूरोसर्जरीचा एक रुग्ण कूपरमध्ये अॅडमिट झाला होता, मात्र इंटरनेट नाही, वाय-फाय नाही असे सांगून त्याची सर्जरी रद्द करण्यात आली. अन्य एका न्यूरो रुग्णालाही आयसीयू नाही, असे सांगून पाच दिवस थांबवले. डीन स्वतः फोन घेत नाहीत, एएमओशी बोला असे सांगतात. आजही ते स्वतः आलेले नाहीत. त्यांनी एएमओला पाठवले आहे. डीन करोडोंचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर पाठवतात. मात्र कोणत्याही गोष्टींचा खुलासा करायला येत नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव नामंजूर करावा, अशी मागणी यशोधर फणसे यांनी केली.
स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून अधिष्ठात्यांना तातडीने समितीसमोर बोलावले जात नसल्याचे स्पष्ट केले, मात्र अधिकाऱ्यांचे बेदरकार वर्तन खपवून घेतले जाणार नाही. आयुक्तांनी संबंधितांना समज द्यावी आणि सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. जोपर्यंत डीन स्वतः स्थायी समितीसमोर येऊन खुलासा करत नाहीत तोपर्यंत त्यांचा एकही प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही, असे प्रभाकर शिंदे म्हणाले.































































