पावसाच्या उघडिपीनंतर पेरण्यांची घाई; सांगलीत भात, ज्वारीचे क्षेत्र घटले; ९४ हजार हेक्टरवर पेरणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने खरीप हंगाम लांबला. गत आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर पेरण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांची घाई उडाल्याचे चित्र आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९४,३७५ हेक्टर म्हणजेच सरासरी ३९ टक्के क्षेत्रांवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची १६,३९२ हेक्टरवर त्यापाठोपाठ बाजरी १८,३७६, भाताची १८,८९४ तर भुईमुगाची १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यावेळी ज्वारी आणि भाताचे क्षेत्र घटले. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कमी कालावधीत येणारी खरीप पिके १५ जुलैपर्यंत पेरता येतील, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

सांगली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ८ लाख ६१ हजार हेक्टर असून, त्यापैकी निव्वळ पिकांखालील क्षेत्र ५ लाख ७६ हजार ९०३ हेक्टर आहे. खरिपाचे सरासरी पेरणी क्षेत्र २ लाख ४६ हजार ११८ हेक्टर आहे. खरीप हंगामासाठी ज्वारी, बाजरी, मका, भात, तूर, उडीद, मूग, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांसाठी २७ हजार ३७३ क्विंटल बियाणांची मागणी आहे. पावसाने मध्यंतरी उघडीप दिल्यामुळे बियाणांची मागणीही उशिराने सुरू झाली. कृषी विभागामार्फत तूर, मूग आणि उडीद या पिकांचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पेरणीसाठी क्षेत्र तयार असूनही पावसाअभावी पेरण्या लांबल्या होत्या. जून महिना कोरडा गेल्यानंतर गत आठवड्यात जिह्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर जिह्यात पेरण्यांना गती आली. चालू वर्षी भात आणि ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली आहे. पश्चिम भागातील शिराळा तालुक्यात भाताची रोप लागण करण्यात आली आहे. यंदा भाताचे क्षेत्र घटले असून, अवघ्या ८ हजार हेक्टरवर भात लागण आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज पश्चिम भागात सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील चारही तालुक्यांत सोयाबीनची ४२ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली. याशिवाय बाजरी १८,३७६ तर मका १८८९४, भुईमुगाची १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली.

दीड लाख हेक्टर पेरणीच्या प्रतीक्षेत

पूर्व भागातील तासगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी आणि खानापूर तालुक्यात सिंचन योजनांचे पाणी आल्याने ज्वारीचे उत्पादन घटणार असल्याचे स्पष्ट झाले. यंदा ज्वारीसाठी सरासरी २६ हजार हेक्टर क्षेत्र असले तरी आत्तापर्यंत अवघ्या ७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच तूर ५ हजार ५८७, मूग १ हजार ३७८ आणि उदीड ३३ हजार ५४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिह्यात आत्तापर्यंत ३९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, अद्यापही दीड लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. आता पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांची िंचता नव्याने वाढणार असल्याचे चित्र आहे.