‘बुमरा’ नावाचे वादळ पुन्हा घोंगावले! दोन वर्षांच्या विश्रांतीनंतरही इंग्लंडची फलंदाजी हादरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जसप्रीत बुमरा मैदानावर उतरला की सामन्याचा रंगच बदलतो याची प्रचीती एजबॅस्टनवर पुन्हा आली. तब्बल दोन वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना त्याने जादुई गोलंदाजीने इंग्लंडच्या फलंदाजांवर जबरदस्त दबाव निर्माण केला. त्याच्या खात्यात केवळ एक विकेट जमा झाली तरी भारताच्या विजयाचा पाया त्यानेच रचला.

2023 च्या विश्वचषक अंतिम सामन्यानंतर बुमराने एकही वन डे खेळला नव्हता. त्या काळात हिंदुस्थानने 26 सामने खेळले, मात्र सलग दोन टी-20 विश्वचषक मोहिमांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे पुनरागमनानंतर त्याची लय कशी असेल, याची उत्सुकता होती, मात्र बुमराने पहिल्याच स्पेलमध्ये ती शंका दूर केली.

खेळपट्टीवरील ओलाव्याचा अचूक फायदा घेत त्याने सलामीवीर बेन डकेटला सुरुवातीपासूनच अडचणीत टाकले. बाहेर जाणाऱया आणि अचानक आत वळणाऱया चेंडूंनी डकेटला सतत अस्वस्थ ठेवले. पहिल्याच षटकात एलबीडब्ल्यूची जोरदार अपील झाली, तर पुढील षटकात उसळत्या चेंडूने डकेटच्या बोटाला दुखापत झाली. त्याला दोनदा उपचार घ्यावे लागले.

समालोचक स्टुअर्ट ब्रॉडने निरीक्षण नोंदवले की, बुमराचा आत वळणारा चेंडू अधिक वेगाने फलंदाजाकडे येतो. याच काwशल्यामुळे जगातील सर्वोत्तम फलंदाजही त्याच्यासमोर गोंधळतात. बुमराच्या अचूक माऱयामुळे डकेट आणि जेकब बेथेल यांनी घाईत फटके खेळले आणि त्याचा फायदा नवोदित गुरनूर ब्रारला झाला.

यानंतर बुमराने आपल्या वन डे कारकीर्दीतील 150 वा विकेट घेत हॅरी ब्रूकला बाद केले. अवघ्या 127 किमी प्रतितास वेगाच्या चेंडूवर सीम आणि उसळीचा अप्रतिम वापर करत त्याने ब्रूकचा स्लिपमध्ये झेल घेतला. सामन्यानंतर ब्रूकनेही, ‘तो उत्कृष्ट चेंडू होता,’ एवढय़ाच शब्दांत बुमराचे कौतुक केले.

बुमराने नऊ षटकांत एक विकेट घेतली असली तरी तीन वेगवेगळ्या स्पेलमध्ये इंग्लंडला सतत दबावाखाली ठेवले. आयपीएलमधील अखेरचा सामना 20 मे रोजी खेळल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळत होता.