
मॅसॅच्युसेट्समध्ये स्कायडायव्हिंग करताना 30 फूट उंचीवरून खाली पडल्याने एका 28 वर्षीय हिंदुस्थानी तरुणाचा मृत्यू झाला. मणी चंद्र तेज गड्डम असे मयत तरुणाचे नाव आहे. वाऱ्याच्या अचानक आणि अनपेक्षित झोतामुळे ही दुर्घटना घडली. मणीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जंपटाउन स्कायडायव्हिंग येथे ही घटना घडली. अपघाताबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मणीला स्कायडायव्हिंगची आवड होती आणि नुकतेच त्याने स्कायडायव्हिंगमधील ‘ए-लायसन्स’ (A License) मिळवले होते, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. मणीला नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन आव्हाने स्वीकारण्याची मनापासून आवड होती. अपघातानंतर जंपटाउन स्कायडायव्हिंगने एक निवेदन जारी केले. या निवेदनात या घटनेमुळे आपल्याला अत्यंत दुःख झाले असून, या अपघातात जीव गमावलेल्या स्कायडायव्हरच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि आप्तेष्टांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे म्हटले आहे.
हवामानातील अचानक आणि अनपेक्षित बदलामुळे ही घटना घडल्याचे दिसून येत आहे. अपघात प्रकरणी सुरू असलेल्या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. तपास सुरू असेपर्यंत आम्ही यावर अधिक भाष्य करणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


























































