
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील तरीबंदर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाने आता सर्व मर्यादा ओलांडल्या असून महसूल विभागाने पंचनामा करून जप्त केलेली वाळूच दुसऱ्याच दिवशी रातोरात चोरी करून विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे रेतीमाफियांची मुजोरी किती वाढली आहे, याचे ज्वलंत उदाहरण समोर आले असून, महसूल यंत्रणेलाच उघड आव्हान दिले जात असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
शनिवार, ११ जुलै रोजी आंजर्ले तरीबंदर येथे महसूल विभागाने कारवाई करत बेकायदेशीररीत्या उपसा केलेली सुमारे पाच ब्रास वाळू जप्त केली होती. या कारवाईदरम्यान मंडळ अधिकारी संदीप देवघरकर आणि तलाठी उत्तम पाटील यांनी पंचनामा केला. जप्त केलेली वाळू पोलीस पाटील कलमकर यांच्या ताब्यात देण्यात आली होती.
या कारवाईनंतर अवघ्या काही तासांतच रेतीमाफियांनी निर्भीडपणे तीच जप्त वाळू रात्रीच्या अंधारात तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पंचनामा झालेली आणि शासनाच्या ताब्यात असलेली वाळूच चोरीला जाणे, ही बाब महसूल विभागाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
आंजर्ले तरीबंदर परिसरात अनेक दिवसांपासून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी होत आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार आवाज उठवूनही रेतीमाफियांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. उलट कारवाई झाल्यानंतरही जप्त वाळू सुरक्षित राहू शकत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणी मंडळ अधिकारी संदीप देवघरकर यांनी संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल तहसीलदार, दापोली यांच्याकडे सादर केला आहे. तसेच जप्त वाळू चोरीला गेल्याप्रकरणी पोलीस पाटील कलमकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करावा, अशा सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, जप्त वाळूच चोरीला जाण्याच्या अभूतपूर्व घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. महसूल विभागाची कारवाई केवळ कागदोपत्रीच राहते का? रेतीमाफियांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे? जप्त मालावरही डल्ला मारण्याइतकी हिंमत त्यांच्यात येते कुठून? असे संतप्त प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
आंजर्लेतील बेकायदेशीर वाळू उपशाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी महसूल, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे कठोर कारवाई करावी, रेतीमाफियांचे आर्थिक साखळी उद्ध्वस्त करावेत आणि जप्त वाळू चोरी प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आता या गंभीर प्रकरणात प्रशासन केवळ अहवालापुरते मर्यादित राहणार की रेतीमाफियांवर खरोखरच धडक कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




























































