
स्पेनने फ्रान्ससारख्या बलाढ्य संघाला धक्का देत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यापूर्वी फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेची जोरदार चर्चा होती, पण त्याला या सामन्यात कसे रोखले, याचे रहस्य मुख्य प्रशिक्षक लुईस दे ला फुएंते यांनी सामन्यानंतर सांगितले आहे.
स्टार खेळाडू एम्बाप्पेला संपूर्ण सामन्यात प्रभावी ठरू न देण्याबद्दल फुएंते म्हणाले, ‘फ्रान्स हा जगातील सर्वात बलाढय़ संघांपैकी एक आहे. एम्बाप्पे हा त्यांचा महत्त्वाचा खेळाडू होता. पण त्याला कसे रोखायचे, हे आम्ही ठरवले होते. आम्ही शिस्त आणि सांघिक खेळाच्या जोरावर त्यांचे शॉट्स रोखले. जेव्हा संपूर्ण संघ एकत्र खेळतो तेव्हा त्यांना हरवणे खूप कठीण होऊन बसते.’
सामन्यानंतर फुएंते म्हणाले की, चार वर्षांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळत आहे. आम्ही जवळपास चार वर्षांपूर्वी एका दूरदृष्टीने काम सुरू केले आणि आमचा विश्वास शेवटपर्यंत टिकवून ठेवला. आज आम्ही जगातील सर्वात बलाढय़ संघांपैकी एक असलेल्या फ्रान्सविरुद्ध खेळलो, पण त्यांचा सामना जगातील सर्वोत्तम संघाशी होता. ते पुढे म्हणाले की, ‘संघभावना ही आमची सर्वात मोठी ताकद आहे. आमच्या संघाची सर्वात मोठी ताकद कोणत्याही एका खेळाडूची कामगिरी नसून संपूर्ण संघ आहे. आम्ही 2010 च्या विश्वचषकातील उत्साह आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवला आहे. आमच्या संघाचा उत्साह यावरून दिसून येतो की, उपांत्य फेरीत न खेळलेले खेळाडूदेखील सामन्यानंतर सरावासाठी मैदानावर थांबले होते. हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे.’
स्पेनच्या राजाने केले अभिनंदन
फुएंते यांनी हेदेखील सांगितले की, विजयानंतर स्पेनचे राजे फेलिपे सहावे यांनी ड्रेसिंग रूमला बोलावून संपूर्ण संघाचे अभिनंदन केले. पण अंतिम फेरीत पोहोचणे हे अंतिम ध्येय नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.





























































