देशात 9 वर्षांत 622 सफाई कामगारांचा मृत्यू; 52 कुटुंबे अजूनही भरपाईपासून वंचित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात हाताने विष्ठा उचलण्यावर कायद्याने बंदी घालून दशकाहून अधिक काळ उलटला आहे. केंद्र सरकारने गटार व सेप्टिक टँक साफसफाईचे पूर्णपणे यांत्रिकीकरण करण्यासाठी ‘नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम’ योजना सुरू केली असली, तरीही गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना होणारे मृत्यू थांबलेले नाहीत.

मार्च २०२५ मध्ये लोकसभेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०१७ पासून आतापर्यंत देशात गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना किमान ६२२ सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५३९ कुटुंबांना पूर्ण भरपाई, २५ कुटुंबांना अंशतः भरपाई मिळाली आहे, तर ५२ कुटुंबांना अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही. तसेच ६ प्रकरणे कोणताही तोडगा न काढता बाद करण्यात आली आहेत. देशात सर्वाधिक ८६ मृत्यू उत्तर प्रदेशात नोंदवले गेले आहेत. या राज्यातील १३ कुटुंबांना अद्याप भरपाई मिळालेली नाही, तर २ कुटुंबांना अंशतः भरपाई देण्यात आली आहे. दिल्लीत ६२ मृत्यूपैकी ९ कुटुंबे भरपाईपासून वंचित आहेत. महाराष्ट्रातही ९ कुटुंबे भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्हास्तरावरही परिस्थिती चिंताजनक उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे १६ मृत्यू झाले. त्यापैकी केवळ ८ कुटुंबांना पूर्ण भरपाई मिळाली. ६ कुटुंबांना कोणतीही मदत मिळालेली नाही, तर दोन प्रकरणे बंद करण्यात आली. चंदौली आणि आंबेडकर नगर जिल्ह्यातील काही कुटुंबे अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.