
मीरा रोड पोलीस ठाणे हद्दीतील एका गृहनिर्माण सोसायटीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोसायटीत राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी लिफ्टने जात असताना सुरक्षारक्षक विजयकुमार पांडे (३६) याने तिचा लिफ्टमध्ये पाठलाग केला. त्यानंतर मुलीला तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचा हात जबरदस्तीने पकडला. तसेच, ‘अभी से हम दोस्त हैं’, असे म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घाबरलेल्या पीडित मुलीने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात आरोपी विजयकुमार पांडे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

































































