
गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 659 गुंतवणूकदारांना सुमारे 93 लाख 92 हजार 175 रुपयांचा मोठा गंडा घालणाऱ्या जय सिद्धी विनायक (जेएसव्ही) कंपनीच्या फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे, न्यायालयाने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांची हक्काची रक्कम परत देण्याचे आदेश जारी केले आहेत.
या पार्श्वभूमीवर, पीडित गुंतवणूकदारांनी आपली कागदपत्रे पुढील दोन दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे सादर करावीत, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. जय सिद्धी विनायक कंपनीच्या संचालकांनी विविध आकर्षक ठेव योजनांचे आमिष दाखवून तब्बल 659 मध्यमवर्गीय व सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढले. लोकांचा विश्वास संपादन करून 93 लाख 92 हजार 175 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी लाखांदूरचे रहिवासी भरत बाबुराव दिघोरे यांच्या तक्रारीवरून ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात कंपनीचे संचालक विजयालक्ष्मी कटेत (भोपाळ), दिनेश टेंभरे (आमगाव), योगेश रेहपाडे (चंद्रपूर) आणि निखिल शेंडे (लाखांदूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘एमपीआयडी’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.































































