
यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी शहरात स्मार्ट वीज मीटरच्या स्थापनेविरोधात नागरिकांचा संताप सोमवारी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्मार्ट मीटर रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील व्यापारी, शेतकरी, महिला, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरात जनसागर उसळल्याचे चित्र निर्माण झाले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून नागरिक मोठ्या संख्येने आठवडी बाजार परिसरात जमा होऊ लागले. हातात फलक, बॅनर आणि घोषणाबाजी करत नागरिकांनी स्मार्ट मीटरविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. “स्मार्ट मीटर हद्दपार करा”, ‘जनतेवर अन्याय चालणार नाही’, ‘स्मार्ट मीटर योजना रद्द करा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांचा भव्य मोर्चा आठवडी बाजार परिसरातून महावितरणच्या स्थानिक कार्यालयावर धडकणार असून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात वाढ होण्याची भीती, ग्राहकांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता तसेच प्रीपेड पद्धतीबाबत असलेल्या शंकांमुळे नागरिकांनी या योजनेला तीव्र विरोध दर्शविला.
दरम्यान, आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. महत्त्वाच्या चौकांवर तसेच महावितरण कार्यालय परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ढाणकीतील या आंदोलनामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले असून व्यापारी व्यवहारांवरही परिणाम झाला. नागरिकांच्या मागण्यांवर महावितरण व शासन काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





























































