
म्यानमारच्या किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बुडाल्या. या दुर्घटनेत 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित अलीकडच्या काळातील ही सर्वात भीषण सागरी दुर्घटनांपैकी एक असू शकते, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. या घटनेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी संभाव्य मोठ्या जीवितहानीमुळे चिंतेत असल्याचे ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’ (IOM) आणि ‘यूएन हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज’ (UNHCR) यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या बोटी जूनच्या अखेरीस म्यानमारमधील संघर्षग्रस्त रखाइन राज्यातून निघाल्या होत्या, अशी प्राथमिक माहिती मिळते. काही प्रवाशांनी शेजारील बांगलादेशातील निर्वासित छावण्यांतूनही प्रवास सुरू केला होता. एका बोटीवर सुमारे 250 लोक होते असे मानले जाते. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच बोटीचा संपर्क तुटला. तर दुसरी 280 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट 8 जुलै रोजी म्यानमारच्या अयेयारवाडी (Ayeyarwady) किनारपट्टीजवळ बुडाल्याचा अंदाज आहे.
गेल्या काही वर्षांत बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रातील या मार्गावर हजारो रोहिंग्यांनी आपले प्राण गमावले आहेत; यामध्ये लहान मुले, अर्भके आणि गर्भवती महिलांचाही समावेश आहे. UNHCR च्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये 6,500 हून अधिक रोहिंग्यांनी समुद्रमार्गे धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी सुमारे 900 जण मृत किंवा बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. जगभरातील निर्वासित आणि स्थलांतरितांच्या प्रमुख सागरी मार्गांपैकी या मार्गावर आता मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे, असे संस्थेने म्हटले आहे.





























































