भयंकर! डॉक्टर पतीचा निर्घृण खून; 8 वर्षांच्या मुलालाही चाकूनं भोसकलं; मृतदेहाशेजारी बसून डॉक्टर पत्नी मोबाईल स्क्रोल करत राहिली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकच्या धारवड शहरात एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. येथे एका 45 वर्षीय व्यक्तीची त्याच्या पत्नीने राहत्या घरात निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. हे दोघेही पेशाने डॉक्टर आहेत. आरोपी महिलेने केवळ पतीची हत्या केली नाही, तर आपल्या 8 वर्षांच्या निष्पाप मुलावरही चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉ. किरण  होनान्नवर असे मृत डॉक्टरचे नाव असून डॉ. प्रियांका कट्टनहल्ली असे आरोपी पत्नीचे नाव आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळच्या सुमारास काही नातेवाईक या दाम्पत्याच्या फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा त्यांना घरात अत्यंत भयावह दृश्य पाहायला मिळाले. संपूर्ण अपार्टमेंटमध्ये रक्ताचे डाग होते. डॉ. किरण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. धक्कादायक बाब म्हणजे, पती आणि मुलावर जीवघेणा हल्ला केल्यानंतरही आरोपी पत्नी प्रियांका बेडवर पडून आरामात आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहत बसली होती. घटनेनंतर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये तिची ही असंवेदनशीलता स्पष्टपणे दिसून आली आहे, ज्यामुळे पोलीसही चक्रावून गेले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 8 वर्षांच्या मुलाचा श्वास अजून चालू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी कोणतीही वेळ वाया न घालवता त्या जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले.

मृत डॉ. किरण होनान्नावर हे ‘चिरायू हॉस्पिटल’मध्ये भूलतज्ज्ञ (Anaesthetist) म्हणून कार्यरत होते, तर त्यांची पत्नी प्रियांका ही नेत्ररोग तज्ज्ञ (MS Ophthalmology) आहे. ते पवन हायस्कूलसमोरील एका अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर राहत होते. मात्र या संपूर्ण प्रकरणात कौटुंबिक वाद किंवा नेमके काय कारण होते, याचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

आरोपी प्रियांकाने दिवसभरात कोणाशी संवाद साधला, तिने त्यांना काय सांगितले आणि घरात नक्की काय घडले, याचा सखोल तपास करण्यासाठी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.