
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एका अज्ञात भक्ताने निस्सीम भक्तीचे दर्शन घडवत तब्बल अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका अर्पण केल्या आहेत. अहिल्यानगर येथील या भक्ताने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर ही मौल्यवान भेट दिली आहे. या पादुकांची किंमत 56 लाख रुपये इतकी आहे. मंदिर समितीच्या खजिन्यात भर टाकणाऱ्या या सोन्याच्या पादुकांमुळे विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भक्तांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरली आहे.
आतापर्यंत मंदिराकडे चांदीच्या पादुका होत्या, मात्र आता या सोन्याच्या पादुकांचे आगमन झाले आहे. विशेष सण-उत्सवांच्या दिवशी या पादुका विठ्ठलाच्या समोर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली. सध्या आषाढी वारीसाठी वारकरी दिड्यांसह पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. अशा मंगलमय वातावरणात मिळालेल्या या देणगीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गरिबांचा देव होतोय श्रीमंत, विठुरायाच्या चरणी सोन्याच्या पादुका अर्पण pic.twitter.com/xcPMyqs3Wc
— Saamana Online (@SaamanaOnline) July 16, 2026






























































