
जागतिक पातळीवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने मोठी घोषणा केली आहे. चीनने हिलियम गॅसच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. चीन आशिया खंडात तब्बल 80 टक्क्यांपर्यंत हिलियमचा पुरवठा आणि वितरण करतो. मात्र, आता चीनच्या या बंदीमुळे जगात चिप (Chip) आणि सेमीकंडक्टर क्षेत्रासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. ही बंदी दीर्घकाळ राहिल्यास इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षाच्या सुरुवातीला जगातील सर्वात मोठ्या हिलियम केंद्रांपैकी एक असलेल्या कतारच्या ‘रास लाफान’ प्लांटवर लष्करी हल्ले झाले होते. या हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेत दरमहा 5 दशलक्ष क्युबिक मीटरहून अधिक हिलियमचा पुरवठा थांबला होता. युद्ध थांबल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशा होती. मात्र चीनच्या या निर्णयामुळे आधीच तुटवडा असलेल्या हिलियम बाजारपेठेवरचा दबाव आणखी वाढला आहे.
कुठे आणि कसा होतो हीलियम गॅसचा वापर वापर?
हिलियम गॅसचा वापर वेफर कूलिंग, लीक डिटेक्शन आणि क्रायोजेनिक सिस्टम्स सारख्या क्लिष्ट प्रक्रियेसाठी केला जातो. हा खर्च कमी असला तरी, पुरवठा थांबल्यास संपूर्ण उत्पादन ठप्प होऊ शकते. या गॅसचा वापर करूनच AI एक्सेलरेटर, जीपीयू (GPUs), ऑटोमोटिव्ह चिप्स (गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्स) आणि मेमरी कार्ड्स (DRAM, NAND) तयार केले जातात. त्यामुळे या बंदीचा थेट फटका तंत्रज्ञान क्षेत्राला बसणार आहे, असे मत टेक्निसाइट्सचे विश्लेषक मनीष रावत यांनी मांडले.
जगावर काय परिणाम होणार?
जगातील हिलियमचा पुरवठा आधीच अमेरिका आणि कतार सारख्या मोजक्या देशांवर अवलंबून आहे. दक्षिण कोरियासारखा मोठा सेमीकंडक्टर हब आपला 65 टक्के हिलियम कतारमधून आणतो. चीन जगातील सर्वात मोठा हिलियम उत्पादक नसला तरी, आशियातील सेमीकंडक्टर कंपन्यांना हिलियम रिफायनिंग आणि पुरवठा साखळीत (Supply Chain) चीनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चीनच्या या निर्णयामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल आणि संपूर्ण इलेक्ट्रॉनिक उद्योगावर मंदीचे सावट येऊ शकते, अशी शक्यता ग्रेहाउंड रिसर्चचे मुख्य विश्लेषक संचित वीर गोगिया यांनी व्यक्त केली.


























































