
शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप कर्जमाफी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे. वीजबील माफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर लाडका उद्योगपती अदानीसाठी केलेली आहे. भाजपा सरकारला MSEB च्या चारही विभागाचे खाजगीकरण करून ते अदानीला आंदण द्यायचे आहे, त्याच्या फायद्यासाठी ही घोषणा आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतदार पुनर्रचना विधयेक हे देशाच्या एकतेला धोका पोहचवणारे आहे. या विधेयकामागील भाजपाचा हेतू देशाचे दक्षिण व उत्तर असे दोन तुकडे करण्याचा आहे म्हणूनच संसदेच्या मागील अधिवेशनात हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा हे विधेयक मंजूर करण्याचा आटापिटा भाजपाने सुरु केला आहे, त्यासाठीच तृणमूल काँग्रेस व शिवसेना पक्ष पुन्हा एकदा फोडण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने या विधेयकावरील आपली भमिका आधीच स्पष्ट केली असून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची चिरफाड संसदेत केलेली आहे. भाजपाला वन नेशन वन पॉलिटीकल पार्टी व्यवस्था देशात आणायची आहे, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.































































