
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या भोंगळ कारभाराचा आणि संबंधित ठेकेदार कंपनीच्या उघड निष्काळजीपणाचा जीवघेणा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. येथील एसटी स्टॅन्डच्या अगदी समोर, महामार्गाच्या कामादरम्यान टाकलेल्या जुन्या सिमेंटच्या पाईप पूर्णपणे तुटून गेल्या आहेत. परिणामी, या ठिकाणी प्रचंड मोठा आणि धोकादायक खड्डा तयार झाला असून, हा रस्ता सध्या वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.
पोलीस ठाण्यासमोर एस टी बस मातीत रुतल्याच्या गंभीर घटनेनंतरही ठेकेदाराला जाग आलेली नाही. आता एसटी स्टॅन्डसमोरील मुख्य रस्त्यावरून दररोज शेकडो लहान-मोठी आणि अवजड वाहने जीव मुठीत धरून ये-जा करत आहेत. हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे, याची पूर्ण कल्पना महामार्ग विभाग आणि ठेकेदाराला आहे. असे असूनही या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साधे बॅरिकेड्स किंवा रात्री चमकणारे रिफ्लेक्टर लावण्याची तसदीही घेतलेली नाही. यामुळे बाहेरून येणाऱ्या नवीन वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि अजाणतेपणी वाहने थेट या धोकादायक खड्ड्यात अडकत आहेत. येथे दुचाकींचे अनेक अपघात झाले झाले आहेत.
पहाटेच्या सुमारास एका मालवाहू वाहनाचे चाक या तुटलेल्या मोरीच्या खड्ड्यात अडकले होते. तेव्हाही हायड्रा मशीन आणून गाडी काढण्यात आली, मात्र ओढताना गाडीचे मोठे नुकसान झाले. अतिशय धक्कादायक बाब म्हणजे, चूक पूर्णपणे ठेकेदाराची असताना, उलट हायड्रा चालकाने गाडी मालकाकडे 4 हजार रुपयांची मागणी केली! या प्रकारामुळे गाडी चालक पुरता हतबल झाला. मात्र, यावेळी उपस्थित असलेल्या जागरूक नागरिकांनी ठेकेदाराच्या या वृत्तीला कडाडून विरोध केला. “तुमच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला आहे. हे खड्डे तुम्ही जाणूनबुजून पैसे कमावण्यासाठीच ठेवले आहेत का?” असा संतप्त जाब नागरिकांनी विचारला आणि त्या चालकाला पैसे घेण्यापासून रोखत वाहनचालकाला मदत करण्यास सांगितले. ठेकेदाराच्या या पैशांच्या मागणीची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
एवढ्या गंभीर घटना घडून आणि नागरिकांचा रोष समोर येऊनही महामार्ग प्रशासनाला जाग आलेली नाही. बुधवारी रात्रीच्या सुमारास याच धोकादायक जागेवर गॅस सिलेंडरची वाहतूक करणारी एक बोलेरो गाडी चाक खड्ड्यात रुतल्याने अडकली. गॅस सिलिंडर सारख्या संवेदनशील मालाची वाहतूक करणारी गाडी अशा प्रकारे अडकल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही गाडी काढण्यासाठी स्थानिक रिक्षा व्यावसायिकांनी तात्काळ धाव घेतली. सुरुवातीला गाडी निघत नव्हती, मात्र नेहमीच महामार्गावर संकटसमयी देवदूतासारखे धावून जाणाऱ्या या रिक्षा चालकांनी हार मानली नाही. अखेर दुसऱ्या एका वाहनाच्या मदतीने आणि उपस्थित रिक्षा व्यावसायिकांनी ‘दे धक्का’ करत, प्रचंड कसरतीने आणि जीवाची बाजी लावून ती गॅसची गाडी सुखरूप बाहेर काढली.




























































