
ब्रेकअप केल्याच्या रागातून माजी प्रियकराच्या भावाने लॉ ची विद्यार्थिनी असलेल्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना बंगळुरुत घडली. अमृता असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमृताचा प्रियकर धनुष आणि त्याचा हल्लेखोर भाऊ सूर्याला अटक केली आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अमृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सी.व्ही. रमण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अमृता आणि धनुषची एका कौटुंबिक व्यक्तीमार्फत ओळख झाली होती. या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. धनुषचे आधीच लग्न झाले आहे आणि त्याला एक मूलही आहे. मात्र त्याने ही बाब अमृतापासून लपवून ठेवली. अमृता कायद्याचे शिक्षण घेत होती आणि एका पिझ्झा आउटलेटमध्ये अर्धवेळ कामही करत होती.
धनुषच्या पहिल्या लग्नाबाबत कळल्यानंतर अमृताने त्याच्याशी ब्रेकअप केले. ब्रेकअप करण्याच्या निर्णयावरून धनुषचा भाऊ सूर्या याने अमृताला धमकावले होते. 13 जुलै रोजी सूर्याने अमृताला तिच्या घराबाहेर गाठले. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि त्यादरम्यान सूर्याने अमृताच्या छातीवर व पाठीवर चाकूने वार केले व घटनास्थळावरून पळ काढला.
गंभीर जखमी अवस्थेत अमृताला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान बुधवारी तिचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी धनुष आणि सूर्या दोघांवरही गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.



























































