धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि सोनम वांगचुक यांना शिक्षणमंत्री बनवा; अरविंद केजरीवाल यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. नीट परीक्षेतील कथित अनियमिततेच्या विरोधात सुरू असलेल्या या उपोषणाचा १९ वा दिवस आहे. अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, संजय सिंह, सौरभ भारद्वाज, सपा खासदार डिंपल यादव आणि शेतकरी नेते राकेश टिकैत हेही उपस्थित होते. या बैठकीदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि सोनम वांगचुक यांची देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्रीपदी नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

अरविंद केजरीवाल म्हणाले, मी सोनम वांगचुक यांना सलाम करतो. ते गेल्या १९ दिवसांपासून उपोषणावर आहेत, स्वतःसाठी नाही, तर तरुणांसाठी. आपल्या देशात असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये आवाज उठवला तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. त्यांचा आवाज दाबला गेला. मी त्यांनाही सलाम करतो. मी लडाखच्या लोकांनाही सलाम करतो.धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि सोनम वांगचुक यांना देशाचे शिक्षण मंत्री बनवावे, अशी मागणी त्यांनी केली.

नीट (NEET) परीक्षेतील अनियमिततेच्या विरोधात सोनम वांगचुक जंतर मंतरवर १९ व्या दिवशीही उपोषणावर आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी केजरीवाल यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि सोनम वांगचुक यांची शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्याची मागणी केली.

स्पर्धा परीक्षा हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मी सुद्धा आयआयटीमध्ये शिकलो. माझ्या काळात किंवा माझ्या काळातही पेपरफुटी झाली नाही. आता पेपरफुटी ही एक वार्षिक पद्धतच झाली आहे. दरवर्षी पेपरफुटी होते. समित्या स्थापन केल्या जातात आणि चौकशी केली जाते, पण काहीच घडत नाही. पुन्हा पेपरफुटीची तयारी केली जाते. पेपरफुटीनंतर ३० मुलांनी आत्महत्या केली, ती आमचीच मुले होती, असे ते म्हणाले.

तरुण पिढी ही पेपरफुटी किती काळ सहन करणार, ही व्यवस्था बदलावीच लागेल. येताना माझ्या मनात विचार येत होता की, त्याकाळी ४ एप्रिल २०११ मध्ये जेव्हा इथे अण्णा हजारेंसोबत आंदोलन सुरू होते. ते सरकारही खूप अहंकारी होते. आज २०२६ आहे. आजचे सरकारही खूप अहंकारी आहे. मला सांगायचे आहे, आता सोनम वांगचुक यांचे ऐका, नाहीतर २०१४ मध्ये त्या सरकारची जी अवस्था झाली, तीच तुमचीही होईल. मी लोकांना आवाहन करतो की, २० जुलै रोजी जंतर मंतरवर येऊन हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.