
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान थेट सरन्यायाधीशांविरूद्ध अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करणे आणि न्यायालयात गोंधळ घालणे कायद्याच्या दोन विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली आहे. दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस ठाण्यात या गोंधळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कायद्याच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी प्रबल प्रताप सिंग (24) आणि लखनौ विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणारा दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी चंद्र भान (23) यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे टिळक मार्ग पोलिसांनी ही एफआयआर नोंदवला आहे. सरकारी कामात अडथळा आणण्यासह विविध कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर, मंगळवारी रात्री पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांना बेड्या ठोकल्या.
ही संपूर्ण घटना 10 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालय क्रमांक 13 मध्ये घडली. या सुनावणीदरम्यान प्रबल प्रताप सिंह यादव हा स्वतःची बाजू मांडत होता. मात्र, युक्तिवादादरम्यान अचानक त्याने न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय आणण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने थेट सरन्यायाधीशांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि खंडपीठाच्या दिशेने कागदपत्रे उडवली. या प्रकारामुळे न्यायालयाच्या कामकाजात काही काळ मोठा अडथळा निर्माण झाला होता. न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या या वर्तनामुळे अखेर या दोन्ही भावी वकिलांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे.
‘तरुण मुले कधीकधी असे करतात, दुर्लक्ष करा’
सर्वोच्च न्यायालयात गेल्या आठवड्यात झालेल्या या धक्कादायक घटनेवर हिंदुस्थानचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान एका याचिकाकर्त्याने सरन्यायाधीशांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती तसेच न्यायाधीशांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली होती. या संपूर्ण प्रकारावर संयमी भूमिका घेत सरन्यायाधीशांनी या घटनेकडे ‘दुर्लक्ष’ करण्याचे आवाहन केले आहे. तरुण मुले कधीकधी असे करतात. मात्र, याच वेळी त्यांनी देशातील घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा जपणे अधिक महत्त्वाचे असल्याचे ठामपणे सांगितले. सर्व घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा आणि प्रतिमा जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांची प्रतिष्ठा टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.



























































